करोना विषाणूमुळे भारतात परिस्थिती अधिकच खराब होत चालली आहे. याचा परिणाम सध्या सुरू असलेल्या आयपीएलवरही होत आहे. या स्पर्धेत खेळणारे ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू मायदेशी परतल्यानंतर आता अजून दोन खेळाडू ऑस्ट्रेलियात जाणार असल्याचे वृत्त आहे. सीमा बंद होण्याच्या आत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे खेळाडूही ऑस्ट्रेलियात जाऊ शकतात.

ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे सरकार भारताची सर्व उड्डाणे रद्द करणार आहेत. “डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसह सर्व ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सीमा बंद होण्यापूर्वी परत येऊ शकतात,” अशी माहिती आयएनएसने दिली आहे.

‘आयपीएल’वर भयसावट!

अँड्र्यू टाय, अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्ड्सन आयपीएल सोडून ऑस्ट्रेलियामध्ये परतले आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलने या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले, बायो-बबलमध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे नाईलने सांगितले होते.

तत्पूर्वी, केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गननेही करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली. आयपीएल सर्व खेळाडूंना सुरक्षित वातावरण करते. मॉर्गनने बुंडेस्लिगा आणि प्रीमियर लीग यासारख्या फुटबॉलच्या प्रतिष्ठित स्पर्धांचा उल्लेख केला. मॉर्गनच्या म्हणण्यानुसार देशात संपूर्ण लॉकडाऊन असूनही या लीगही खेळल्या गेल्या. त्याचबरोबर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने करोनाच्या संकटात आयपीएलचे आयोजन केले जाईल, असे सांगितले.

आयपीएल २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू

स्टीव्ह स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद), पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) हे आयपीएलमध्ये भाग घेणाऱ्या १७ ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंपैकी आहेत. जोश हेजलवुड (चेन्नई सुपर किंग्ज), मिच मार्श (सनरायझर्स हैदराबाद) आणि जोश फिलिप (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयपीएलमधून माघार घेतली.