अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संघातून वगळण्याच्या निर्णयाचा आपल्याला कोणताही खेद नाही, असे स्पष्टीकरण इंग्लंडचा प्रभारी कर्णधार बेन स्टोक्सने दिले.

विंडीजने इंग्लंडला पहिल्या सामन्यात चार गडी राखून पराभूत केले. या कसोटीसाठी स्टोक्सने जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर यांच्या साथीला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ब्रॉडऐवजी मार्क वूडला पसंती दिली. स्टोक्सच्या या निर्णयावर अनेक आजी-माजी खेळाडूंनी टीका केली.

‘‘कर्णधार म्हणून तुम्हाला काही कठोर निर्णय घेणे भाग असते. खेळपट्टी आणि हवामानाचा अंदाज घेऊनच संघ व्यवस्थापनाने अधिक वेगाने गोलंदाजी करण्याबरोबरच चेंडू स्विंग करणाऱ्या गोलंदाजाला प्राधान्य देण्याचे ठरवले. त्यामुळे वूडला पसंती देण्यात आली. त्यामुळे ब्रॉडला संघातून वगळल्याची मला खंत नाही. कदाचित दुसऱ्या कसोटीत त्याला संघात घेऊन अन्य एखाद्या गोलंदाजाला वगळण्यात येईल,’’ असे स्टोक्स म्हणाला. त्याशिवाय दुसऱ्या डावात ५० धावा अधिक केल्या असत्या तर सामन्याचा निकाल आमच्या बाजूने लागला असता, असेही स्टोक्सने सांगितले.

गॅब्रिएलमुळे सामन्याला कलाटणी -होल्डर

शॅनन गॅब्रिएलने सामन्याच्या चौथ्या दिवशी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली, असे मत वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले. ‘‘झॅक क्रॉवली आणि बेन स्टोक्स यांच्या भागीदारीमुळे एक वेळ सामना आमच्या हातून निसटतो की काय, अशी चिंता निर्माण झाली होती. परंतु चौथ्या दिवसाच्या अखेरीस गॅब्रिएलने अफलातून गोलंदाजी केली. त्यामुळे ३ बाद २४९वरून इंग्लंडचा डाव ३१३ धावांत गुंडाळण्यात आम्हाला यश आले,’’ असे होल्डर म्हणाला.