मुंबईचा संथ पाठलाग तामिळनाडू सर्व बाद ४६४ मुंबई २ बाद ४५
पहिल्या डावाच्या आघाडीच्या बळावर गुण वसूल करण्याचे प्रयत्न मुंबईकडून रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या दुसऱ्या दिवशीच पाहायला मिळाले. पाटा खेळपट्टीवर तामिळनाडूने दीड दिवस खेळून काढल्यावर कूर्मगतीने पहिल्या डावाची सुरुवात करत मुंबईने दिवसअखेर २ बाद ४५ अशी मजल मारली आहे. पहिल्या दिवशी संघाला स्थिरस्थावर करणाऱ्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या दिवशी सुंदर दीडशतक झळकावत संघाला ४६४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. मुंबईचा डावखुरा फिरकीपटू विशाल दाभोळकरने डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली.
बलविंदरसिंग संधूच्या संथ गोलंदाजीने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू तर त्याने इतका संथ टाकला की मलोना रंगराजनला ४-५ पावले पुढे येऊन तो खेळावा लागला. पहिल्या सत्रात मुंबईचे गोलंदाज काहीसे दुर्दैवी ठरले. कारण वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर रंगराजनला (६१) झेलबाद दिले नाही. त्याचबरोबर कार्तिक शतकाच्या उंबरठय़ावर असताना शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याचे पायचीतचे अपील नामंजूर केले. त्यानंतर कार्तिकने शतक झळकावले आणि गोलंदाजांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. त्यानंतरच्या ५० धावा त्याने ४९ चेंडूंमध्ये जमवल्या. कार्तिक आणि रंगराजन या जोडीने पहिले सत्र पूर्णपणे खेळून काढले. या सत्रात या दोघांनी ३५ षटकांमध्ये १३१ धावा जमवल्या. पहिल्या दिवशी मुंबईला उपाहारानंतर तीन बळी झटपट मिळाले होते, दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरच्या दुसऱ्या षटकात रंगराजनला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर तीन षटकांमध्ये विशालला स्वीप मारण्याच्या नादात कार्तिकच्या दीडशतकी खेळीचा शेवट झाला. कार्तिकने १९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १६७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. संघाच्या ३९९ धावा असताना कार्तिक बाद झाला. त्या वेळी मुंबई तामिळनाडूचा डाव झटपट गुंडाळेल असे वाटत होते. पण अस्विन ख्रिस्तने नाबाद २४ धावांची खेळी केली आणि त्याने मुंबईला आणखी १४ षटके वाट पाहायला लागली.
मुंबईने संथपणे डावाची सुरुवात केली. एम. मोहम्मदने पहिली पाच षटके अखिल हेरवडकरला निर्धाव टाकली. दुसऱ्यांदा गोलंदाजीला आल्यावर मोहम्मदनेच अखिलला बाद केले. अखिलने ६३ चेंडूंमध्ये ११ धावा केल्या. अखिल बाद झाल्यावर गेल्या सामन्यातील द्विशतकवीर श्रेयस अय्यरने (१९) काही चांगले फटके मारले, पण त्याची खेळी अल्पायुषी ठरली. सलामीवीर श्रीदीप मंगेलाने संथपणे खेळून काढण्याची भूमिका चोख बजावत ८७ चेंडूंमध्ये तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
तामिळनाडू (पहिला डाव) : १४४.४ षटकांत सर्व बाद ४३४ (दिनेश कार्तिक १६७, बाबा अपराजित ६२, एम. रंगराजन ६१; विशाल दाभोळकर ५/ १२२) वि. मुंबई (पहिला डाव) : २९ षटकांत २ बाद ४५ (श्रीदीप मंगेला खेळत आहे २०; जे. कौशिक १/४, एम. मोहम्मद १/१७)