ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामधून कुस्ती या खेळास वगळल्यास या खेळात कारकीर्द करण्यास नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळणार नाही. त्यामुळेच कुस्तीस २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये स्थान द्यावे, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीस (आयओसी) केली आहे.
मंत्रालयाने या संदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हा निर्णय खेळाडूंसाठी क्लेषदायक व खेळाच्या प्रगतीला मारक आहे. कुस्ती हा केवळ आशियाई खंडात नव्हे तर जगात अतिशय लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता टिकविण्यासाठी हा खेळ ऑलिम्पिकमध्ये ठेवणे अनिवार्य आहे. आयओसीच्या आगामी बैठकीत कुस्तीच्या समावेशाबाबत पुन्हा सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे.
कुस्ती हा खेळ वगळल्यास केवळ भारत नव्हे तर अनेक देशांमधील गुणवान खेळाडूंची खेळातील कारकीर्द खुंटली जाणार आहे. आयओसीने कुस्तीबाबत सकारात्मक विचार करावा असेही क्रीडा मंत्रालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पुन्हा समावेशाबाबत
आयओए आशावादी
ऑलिम्पिकमधून कुस्तीला वगळण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी व खेळास मारक आहे. आयओसीने या निर्णयाबाबत पुन्हा विचार करावा असे आवाहन भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) केले आहे. आयओएचे प्रभारी अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा यांनी सांगितले, या खेळाचा ऑलिम्पिकमध्ये पुन्हा समावेश होईल, अशी आम्हाला आशा आहे. यासाठी जागतिक कुस्ती महासंघास आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.