समोरची व्यक्ती आपल्याला कळायलाच हवी, असा बहुतांशी लोकांचा हेका असतो. त्याचे विचार, दृष्टिकोन, तो आता नेमका काय करेल किंवा तो अमुक वेळेला कसा वागेल आणि तमुक वेळेला कसा बोलेल, हे सारे जाणून घ्यायला आपल्याला आवडत असते. माणूस झटपट समजवून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. पण काही वेळेला अशा काही अपवादात्मक व्यक्ती आपल्या पुढय़ात येतात, की त्यांच्या मनाच्या डोहात शिरता येत नाही आणि शिरायला वाव मिळाला तरी थांग लागत नाही. अशीच एक अपवादात्मक व्यक्ती म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनी कसा वागेल, हे सांगता येणे कठीण. पण त्याच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकल्यास काही अशा उदाहरणांनिशी धोनीचे जगावेगळेपण सिद्ध होते.
ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपद पटकावल्यावर धोनी आणि मिडास राजा यांच्यामध्ये आपल्याला फरक जाणवत नव्हताच. पण कालांतराने खास करून कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची जादू ओसरायला लागल्याची चर्चा सुरू झाली आणि परदेशामध्ये धोनी हा पराभवाचा धनी ठरत होता. जेव्हा तो यशस्वी होत होता, तेव्हा तो त्यामध्ये मश्गुल होता, असे कधीही दिसले नाही. यश मिळवल्यावर शांत राहायचा, पण चुका घडल्यावर त्याचा त्रिफळा उडायचा नाही. पण ही यशाची मस्ती कुठे तरी त्याच्या डोक्यात थोडीफार नक्कीच होती, कुठे तरी सर्वस्व मिळवण्याची सुप्त इच्छाही मनात होती.
अनिल कुंबळे भारताचा कर्णधार असताना बारकाईने पाहिले, तर त्यावेळच्या कुंबळेच्या गोलंदाजीवर धोनी जास्त अपील करताना दिसला नाही. अपील ठाशीव नाही तर विकेट नाही आणि विकेट नाही तर संघातून बाहेर, हा कावेबाजपणा कुठे तरी नक्कीच यशस्वी झाला. कुंबळेचा तसा कारकिर्दीतील शेवटचाच काळ सुरू होता. त्यामुळे कुंबळेकडून नेतृत्व चालून आल्यावर प्रत्येक कर्णधाराला बांधावासा वाटतो तसाच संघ धोनीने बांधायला घेतला. संघातील सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांना बाजूला करण्यासाठी धोनीला काहीही करावे लागले नाही, कारण काहींच्या अस्ताला जाणाऱ्या कारकिर्दीने, तर काहींच्या कामगिरीने त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट केला. लक्ष्मणची निवृत्ती हीसुद्धा अशीच तडकाफडकी झाली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लक्ष्मणची वाईट कामगिरी झाली होती. तो निवृत्ती पत्करायलाही तयार होता, पण त्याला हैदराबादमध्ये होणारा सामना खेळून निवृत्ती पत्करायची होती. हे सांगण्यासाठी त्याने धोनीला बरेच दूरध्वनी केले, पण धोनीने ते उचलले नाहीत. लक्ष्मणने आपली जागा रिकामी करून दिली. पण पडद्यामागे जे मानापमान नाटय़ रंगले, त्याला धोनी जबाबदार होता.
२०११च्या इंग्लंड दौऱ्यामध्ये माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी भारतीय खेळाडू ‘गाढव’ असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला होता की, ‘‘जर मीदेखील त्यांच्यासारखाच वागलो तर त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक असेल!’’ हे पत्रकार परिषदेत सांगताना धोनीच्या मनात राग खदखदत होता. वेस्ट इंडिजकडून गचाळ क्षेत्ररक्षणामुळे जेव्हा इंग्लंडला सामना गमवावा लागला, तेव्हा ‘इंग्लंडच्या गाढवांमुळे वेस्ट इंडिज विजयी’ अशी खोचक टिप्पणी करत त्याने चोख उत्तर दिले होते.
वाद-विवादांनंतरच्या पत्रकार परिषदांमधील खोचक प्रश्नांना धोनीने कधीही उत्तर दिले नाही, फक्त स्मितहास्य करत त्यावर बोलणे तो टाळत आला आणि आणखीन वाद निर्माण करण्याच्या भानगडीत तो पडला नाही. अशी दोन उदाहरणे म्हणजे. आयपीएलचे स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघाशी निगडित एन. श्रीनिवासन आणि गुरुनाथ मयप्पन यांची नावे उजेडात आली होती. त्यानंतर भारतीय संघ एका परदेशी दौऱ्यावर जाणार होता. यावेळी पत्रकारांनी स्पॉट-फिक्सिंगमधील प्रश्नांचा भडीमार केला, पण धोनी प्रत्येक प्रश्नावर फक्त हसतच राहिला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात रवींद्र जडेजा आणि जेम्स अँडरसन वाद चांगलाच गाजला होता. त्यानंतरच्या अध्र्या तासाच्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीने हसतच प्रश्नांचा सामना केला. ‘‘हे विचारण्यापेक्षा मला कठीण प्रश्न विचाराल, असे वाटत होते,’’ असे म्हणत धोनीने पत्रकारांनाही शांत केले.
सध्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एका सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हताश झाला होता. कारण चांगले चेंडू टाकूनही त्याला मार बसत होता. असाच एकदा इशांत हताश होऊन यष्टीमागे असलेल्या धोनीकडे पाहत होता. त्यावेळी धोनी त्याला म्हणाला, ‘‘तुला जिथे चेंडू टाकावासा वाटतो तिथे टाक, त्या चेंडूवर चौकार बसेल, याचा विचार करू नकोस. फक्त तू आपण सर्वोत्तम चेंडू टाकणार आहोत, हेच डोक्यात ठेव.’’ धोनी खेळाडूंवर विश्वास ठेवायचा आणि हरवलेला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी प्रयत्नही करायचा.
सध्याच्या दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील विराट कोहली आणि शिखर धवन, यांचा वाद जगजाहीर झाला. या सामन्यानंतर धोनीने यावर टीका केली होती. पण तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला मात्र, ‘प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण अतिरंजित केले आहे, यावर वॉर्नर ब्रदर्स एक चित्रपटही काढू शकतील’ असे म्हणताना पुन्हा एकदा चाणाक्ष धोनी दिसला.
धोनीच्या निर्णयाचा थांगपत्ता कधीच कोणाला लागला नाही, त्यामुळे प्रतिस्पर्धी त्याला दचकून असायचे. धोनी नेहमीच आपल्या मनाप्रमाणे वागला, पण त्याला त्यानेच बनवलेली एक चतुरपणाची किनार होती. धोनी शांत, चाणाक्ष, हुशार, मस्तवाल, अभ्यासू, वाद-विवादांमध्ये न पडणारा, असाच होता. फक्त त्याची समयसूचकता इतरांपेक्षा जलद होती. सिडनीतील सामन्यानंतर धोनी निवृत्त होईल, असे वाटत होते. परंतु त्याचा निवृत्तीचा निर्णयही असाच धक्कादायक ठरला.