महेंद्रसिंह धोनीने आम्हाला त्याच्या पुढील योजनांसंदर्भात काहीच सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण देत भारताचा कर्णधार विराट कोहलीने या अनुभवी खेळाडूच्या निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या.

भारताने न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव पत्करला. भारताच्या धावसंख्येत धोनीने ७२ चेंडूंत साकारलेल्या ५० धावांचे महत्त्वाचे योगदान होते. परंतु मधल्या षटकांमधील  धोनीच्या संथ फलंदाजीची कोहलीने पुन्हा पाठराखण केली. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. धोनीने आपल्या भविष्यातील योजनांबाबत काही सांगितले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘‘आतापर्यंत तरी त्याने आम्हाला काहीही सांगिलेले नाही.’’ धोनीच्या फलंदाजीबाबत स्पष्टीकरण देताना कोहली म्हणाला, ‘‘धोनीने एक बाजू संयमाने सांभाळत रवींद्र जडेजाला मुक्त फटकेबाजीची संधी देण्याची आवश्यकता होती. संघाची ही गरज समजून त्याने परिस्थितीनुरूप योग्य भूमिका घेतली. कठीण स्थितीतून संघाचा डाव सावरत त्यांनी शतकी भागीदारी रचली.’’