२०११ साली मुंबईच्या अजिंक्य रहाणेने भारतीय संघात आपलं पदार्पण केलं. यानंतर अवघ्या काही कालावधीमध्येच अजिंक्यने आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. सध्या अजिंक्यला मर्यादीत षटकांच्या सामन्यात जागा मिळत नसली तरीही कसोटी संघाचा तो उप-कर्णधार आहे. न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतही अजिंक्यने आश्वासक खेळ केला आहे. India Today वृत्तसमुहाला दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्यने आपला संघर्षमय प्रवास उलगडवून दाखवला.

“माझी क्रिकेट कारकिर्द सुरु झाली ती डोंबिवलीपासून. माझी आई एका हातात माझी क्रिकेटची बॅग आणि एका हातावर माझ्या भावाला घेत मला प्रॅक्टीसला न्यायची. त्यावेळी आम्ही ६ ते ८ किलोमीटर चालायचो. त्या काळात रिक्षाचे पैसेही आईकडे नसायचे…कित्येकदा मी प्रॅक्टीसनंतर थकायचो. अशावेळी मी आईला रिक्षाने जाऊया ना…असा हट्ट करायचो. पण तिच्याकडे त्यावेळी यासाठी उत्तर नव्हतं. मग काही दिवसांनी आम्ही आठवड्यातून एकदा रिक्षाने प्रवास करायला लागलो. आज मी ज्या ठिकाणी येऊन पोहचलो आहे, त्याचं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं. त्यांच्यासाठी मी अजुनही त्यांचा अजिंक्यच आहे.”

परिवाराने माझ्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलाय, त्यामुळे त्यांना चांगलं आयुष्य जगता यावं हे माझं स्वप्न होतं. बाबांनी प्रॅक्टीसच्या पहिल्या दिवशी डोंबिवली ते सीएसटी माझ्यासोबत प्रवास केला, मला सोडून ते ऑफिसला गेले. यानंतर त्यांनी मला सांगितलं की आता उद्यापासून तुला एकटं जायचं आहे…पण नंतर मला समजलं की बाबा माझ्या पाठीमागच्या डब्यात बसलेले असायचे. मी एकटा प्रवास करु शकतो की नाही हे पाहण्यासाठी ते माझ्या पाठीमागून यायचे. एकदा त्यांचा विश्वास बसल्यानंतर मी एकटा प्रवास करायला लागलो. बाबांनी एकदाही माझ्या फॉर्मबद्दल मला प्रश्न विचारला नाही, बाबांबद्दल बोलताना अजिंक्य भावूक झाला होता.