थाळीफेकमध्ये भारताचे आशास्थान असलेल्या विकास गौडा याने विश्व अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत निराशा केली. अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर त्याने सातवे स्थान पटकाविले.
विकासने एकूण सहा प्रयत्नात ६३.४१ मीटर, फाऊल, ६२.२० मीटर, ६४.०३ मीटर, ६३.६७ मीटर, ६३.६४ मीटर अशी कामगिरी केली. त्याची ६६.२६ मीटर ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी येथे त्याला करता आली नाही. विकासने नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णवेध घेत अपेक्षा उंचावल्या होत्या. अमेरिकेत गेली काही वर्षे प्रशिक्षण घेणाऱ्या विकासला अपेक्षेइतक्या अंतरापर्यंत थाळी फेकता आली नाही.
जर्मनीच्या रॉबर्ट हार्टिग याने चौथ्या प्रयत्नात ६९.११ मीटर अंतरापर्यंत थाळीफेक करीत सुवर्णपदक जिंकले. पोलंडच्या पिओत्र मॅलचोवस्की याने पाचव्या प्रयत्नात ६८.३६ मीटपर्यंत थाळी फेकली व रौप्यपदकाची कमाई केली. इस्तोनियाचा गेर्ड कॅन्टेर याने ६५.१९ मीटपर्यंत थाळीफेक करीत कांस्यपदक
मिळविले.