News Flash

आठवडय़ाची मुलाखत :  बुद्धिबळ खेळण्याची सक्ती नको!

बुद्धिबळ खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मदत मिळते. मात्र या खेळाची सक्ती करणे चुकीचे आहे.

विक्रमादित्य कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय मास्टर

‘‘बुद्धिबळ खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला मदत मिळते. मात्र या खेळाची सक्ती करणे चुकीचे आहे. ज्याला या खेळाची आवड आहे, त्यांनीच यामध्ये सहभाग घ्यावा,’’ असे परखड मत मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुलकर्णीने व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पध्रेत अटीतटीच्या लढतीत विक्रमादित्यने हैदराबादच्या चक्रवर्ती रेड्डीवर जवळपास पाच तास रंगलेल्या लढतीत अशक्यप्राय विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर त्याच्याशी केलेली खास बातचीत-

  • जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी तुला विजय अत्यावश्यक होता, तर प्रतिस्पर्धीला बरोबरीही पुरेशी होती. अशा वेळी तुझ्यावर अधिक दडपण होते आणि त्यात तू बाजी मारलीस?

हो, मी अव्वल स्थानापासून अध्र्या गुणाने पिछाडीवर होतो. त्यामुळे स्पर्धा जिंकण्यासाठी विजयाशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. रेड्डीला मात्र बरोबरीही पुरेशी होती. सावध खेळ करून बरोबरी स्वीकारत चौथ्यावर समाधान मानायचे की अव्वल स्थानासाठी झगडायचे, हे मनात पक्के केले आणि अवघड गोष्टीचा पाठलाग अवघ्या डावात सुरू केला. साधारण ४०-५० चालींमध्ये संपणारा सामना ११२व्या चालींपर्यंत रंगला.

  • आजही क्रिकेटेतर खेळांकडे पालकांचा कल फार कमी दिसतो. त्यात बुद्धिबळ हा अधिक दुर्लक्षित राहतो. यासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवे आहेत?

मला असे वाटत नाही. बुद्धिबळात लहान मुलांचा सहभाग अधिक वाढला आहे आणि तो ओघ सुरूच आहे. पालकही त्यांना प्रोत्साहन देत आहे. प्रशिक्षकांच्या वाढलेल्या संख्येचे हे फळ आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे प्रक्षेपण करताना सामान्यांना कळेल अशा भाषेत तिचे वर्णन किंवा समालोचन केल्यास हा अधिकांना समजेल आणि आवडेल. याने या खेळाचा प्रसारही मोठय़ा प्रमाणात होईल.

  • विश्वनाथन आनंदच्या ‘चेस इन स्कूल’ या उपक्रमालाही राज्यात हवा तसा पाठिंबा मिळालेला नाही. यामागचे कारण काय सांगशील?

‘चेस इन स्कूल’बद्दल मला फार कमी माहिती आहे. बुद्धिबळ सगळ्यांनी खेळावे या मताचा मी नाही. ज्यांना हा खेळ आवडतो त्यांनी नक्की खेळावा. त्यामुळे बुद्धिबळाची सक्ती नको.

  • मुंबई, ठाणे यापलीकडे अनेक लहान जिल्ह्यंतून काही खेळाडू चर्चेत आहेत. त्यांना मोठय़ा व्यासपीठाची गरज आहे का?

इंटरनेटमुळे आज बुद्धिबळात भौगोलिक असमानता राहिलेली नाही. आहे ती आर्थिक असमानता. गरीब कुटुंबातील होतकरू बुद्धिबळपटूंना व्यासपीठाची आवश्यकता आहे.

  • बुद्धिबळात दाक्षिणात्य खेळाडूंचे वर्चस्व जाणवते, त्या तुलनेत आपण कुठे आहोत?

या खेळात महाराष्ट्र कदाचित मागे असेल, पण ही चांगली बातमी आहे असे मी म्हणेन. आपल्याकडे पालक शालेय अभ्यास आणि बुद्धिबळ यामध्ये समतोल राखण्यास महत्त्व देतात. दाक्षिणात्य राज्यांमध्ये दोघांपैकी एकात झोकून देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील हा समतोल दृष्टिकोन मला अधिक पटतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2016 2:27 am

Web Title: dont force to play chess says vikramaditya kulkarni
टॅग : Chess
Next Stories
1 लिसेस्टर सिटी जेतेपदाच्या उंबरठय़ावर, मँचेस्टर युनायटेडशी बरोबरी
2 भारतीय महिला संघाला रौप्य
3 बार्सिलोनाचा रिअल बेटिसवर विजय
Just Now!
X