भारत-बांगलादेश कसोटी मालिका

प्रकाशझोतातील सामन्यात गुलाबी चेंडूच्या आव्हानाकडे स्वतंत्रपणे पाहावे लागणार आहे. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू नंतर अधिक गतिमान होतो. त्यामुळे फलंदाजाने फटके खेळण्याची घाई करू नये. त्याने थांबून चेंडूचा अचूक अंदाज घेत फटके खेळावेत, असा सल्ला भारताचा कसोटी क्रिकेटमधील उपकर्णधार अजिंक्य रहाणेने दिला आहे.

भारतीय संघ कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर २२ नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध ऐतिहासिक प्रकाशझोतामधील कसोटी सामना खेळणार आहे. या पार्श्वभूमीवर बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत संचालक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील रहाणे, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी गुलाबी चेंडूच्या सराव सत्रांना हजेरी लावली.

‘‘प्रकाशझोतामधील सामन्याच्या दृष्टीने गुलाबी चेंडूची सराव सत्रे आमच्यासाठी मार्गदर्शक होती. मी प्रथमच गुलाबी चेंडूचा सामना करणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा नवा अनुभव असेल. चेंडूचा वेग आणि स्विंग याकडे मी गांभीर्याने पाहतो आहे,’’ असे रहाणेने सांगितले.

गुलाबी चेंडूच्या दृष्टीने फलंदाजाने आपल्या तंत्रात काही प्रमाणात बदल करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला रहाणेने दिला. तो म्हणाला, ‘‘गुलाबी चेंडू हा लाल चेंडूपेक्षा गतिमान आहे. त्यामुळे उशिराने फटके खेळणे अतिशय महत्त्वाचे असते. याच विषयावर आमची द्रविड यांच्याशी चर्चा झाली.’’

गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या दुलीप करंडक क्रिकेट हंगामात फिरकीपटूंकडून तक्रारी येत होत्या. यासंदर्भात विचारले असता रहाणे म्हणाला, ‘‘दुलीप करंडक स्पर्धेत कुकाबुरा चेंडूचा वापर करण्यात आला होता. परंतु आता एसजी चेंडू वापरला जाणार आहे. त्यामुळे यावेळी ती तक्रार राहील, असे वाटत नाही. बेंगळुरुतील सराव सत्रात आम्ही फिरकी गोलंदाजांचाही सामना केला. त्यांच्या गोलंदाजीत आम्हाला कोणताही फरक आढळला नाही.’’

सायंकाळच्या दृश्यमानतेचे प्रमुख आव्हान -पुजारा

बेंगळूरु : कोलकाता येथे भारत-बांगलादेश यांच्यातील प्रकाशझोतामधील कसोटी सामन्यात सायंकाळच्या दृश्यमानतेचे प्रमुख आव्हान असेल, असे मत कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले आहे. ‘‘मी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत गुलाबी चेंडूने खेळलो आहे. तो अनुभव उत्तम होता. दिवसा दृश्यमानतेची अडचण मुळीच भासणार नाही. परंतु सायंकाळी प्रकाशझोतात दृश्यमानता आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे दुसरे आणि तिसरे सत्र निर्णायक असेल,’’ असे पुजाराने सांगितले.