यजमान इंग्लंडने मँचेस्टरमध्ये पाकिस्तानचा ३ गडी राखून पराभूत केल्यानंतर इंग्लंडने साऊथॅम्प्टन येथे होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने बेन स्टोक्सऐवजी १४ सदस्यीय इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज ओली रॉबिनसनला स्थान दिले आहे. वैयक्तिक कारणास्तव स्टोक्सने उर्वरित मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्याच्या जागी वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. इंग्लंड-पाकिस्तान दुसरी कसोटी १३ ऑगस्टपासून (गुरुवारी) खेळविण्यात येणार आहे. यजमान संघा मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे.

ओली रॉबिन्सन हा वेगवान गोलंदाज आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४४ बळी घेतले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीतही चमक दाखवून दिली आहे. १ शतक आणि ५ अर्धशतकांसह त्याने आपल्या नावावर चांगल्या धावाही जमवल्या आहेत. इंग्लंडने ख्रिस वोक्स आणि जोस बटलरच्या शानदार खेळीमुळे जोरदार पुनरागमन करत पहिली कसोटी तीन गडी राखून जिंकली होती.

असा आहे इंग्लंडचा संघ-

जो रूट- कर्णधार, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॉले, सॅम कुरन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, डोम सिबली, ख्रिस वॉक्स, मार्क वूड