इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मँचेस्टर येथे खेळवण्यात येत असलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकला आहे. तिसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यानंतर संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. चौथ्या दिवशी सुरुवातीच्या दोन सत्रांमध्येही विंडीजच्या फलंदाजांनी चिवट खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली. महत्वाची गोष्ट म्हणजे विंडीजच्या फलंदाजांनी संघावर फॉलोऑनची नामुष्की येऊ दिली नाही. स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि सॅम करन यांच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा पहिला डाव २८७ धावांत आटोपला. इंग्लंडला पहिल्या डावात १८२ धावांची आघाडी मिळाली आहे.

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला विंडीजची जोडी लवकर फोडण्यास इंग्लंडचे गोलंदाज अपयशी ठरले. नाईट वॉचमन जोसेफ आणि क्रेग ब्रेथवेट यांनी चांगली भागीदारी करत विंडीजचा डाव सावरला. ही जोडी फुटल्यानंतर मधल्या फळीत शाई होप, शामराह ब्रुक्स आणि रोस्टन चेस या फलंदाजांनी उपयुक्त खेळी करत संघावरचा फॉलोऑन टाळला. दुसरीकडे क्रेग ब्रेथवेटने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत ८ चौकारांसह ७५ धावांची खेळी केली. त्याला ब्रुक्सने ६८ तर चेसने ५१ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. विंडीजचे मधल्या फळीतले फलंदाज माघारी परतल्यानंतर शेपटाला फारशी वळवळ करण्याची संधी इंग्लंडने दिली नाही. २८७ धावांवर विंडीजचा डाव संपुष्टात आणण्यात अखेरीस इंग्लंडला यश आलं.

अवश्य वाचा – इंग्लंडच्या खेळाडूकडून नियमाचा भंग, चेंडू चमकवण्यासाठी केला लाळेचा वापर

मात्र दुसऱ्या डावातही इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. इंग्लंड संघ व्यवस्थापनाने बेन स्टोक्स आणि जोस बटलरला सलामीला येण्याची संधी दिली. मात्र त्यांचा हा प्रयत्न पुरता फसला. सलामीला आलेला यष्टीरक्षक जोस बटलर आणि झॅक क्रॉली यांना केमार रोचने त्रिफळाचीत करत इंग्लंडला चौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात दोन झटके दिले. अखेरीस बेन स्टोक्स आणि कर्णधार जो रुट यांनी अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. चौथ्या दिवसाअखेरीस इंग्लंडने दुसऱ्या डावात २ गडी गमावत ३७ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडे सध्या २१९ धावांची आघाडी आहे. मात्र या सामन्यात एक दिवसाचा खेळ शिल्लक राहिल्यामुळे इंग्लंडला विजयासाठी प्रयत्न करायचे असल्यास, लवकर डाव घोषित करुन विंडीजला आव्हान द्यावं लागणार आहे.