इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेरीस मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडने केलेल्या ३६९ धावांना प्रत्युत्तर देताना जेसन होल्डर आणि शेन डावरिच यांनी झुंजार खेळी केली. जेसन होल्डरने सर्वाधिक ४६ धावा केल्या, पण त्याला अर्धशतकापासून वंचित राहावे लागले.

जेसन होल्डरने अतिशय झुंजार खेळी करत डाव सावरण्याचा प्रय़त्न केला. त्यातच त्याने एक महत्त्वाचा विक्रमदेखील केला. फलंदाजी करताना होल्डरने कसोटी क्रिकेटमध्ये २००० धावांचा टप्पा पार केला. २००० धावा आणि १०० बळी अशी दुहेरी कामगिरी करणारा जेसन होल्डर हा केवळ तिसरा वेस्ट इंडियन खेळाडू ठरला.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या ३६९ धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. क्रेग ब्रेथवेट १ धाव काढून बाद झाला. कॅम्पबेल आणि होप यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण कॅम्पबेल ३२ तर होप १७ धावांवर माघारी परतले. ब्रुक्स आणि चेसदेखील एकेरी धावसंख्येवर बाद झाले. ब्लॅकवूडने बाद झाल्यावर अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबेपर्यंत कर्णधार जेसन होल्डर आणि डावरिच यांनी खेळपट्टीवर तग धरला.

तिसऱ्या दिवसाच्या खेळात वेस्ट इंडिजचा संघ केवळ ६१ धावांची भर घालू शकला. होल्डर ४६ तर डावरिच ३७ धावांवर माघारी परतला. कॉर्नवॉल आणि रोच झटपट बाद झाले आणि डाव १९७ धावांत संपुष्टात आला. स्टुअर्ट ब्रॉडने ६ बळी घेतले. अँडरसनने २, तर आर्चर-वोक्सने १-१ बळी टिपला.