Women’s T20 World Cup 2020 Ind vs Eng : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

T20 World Cup : सामना न खेळूनही टीम इंडियाने घडवला इतिहास

पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर कमनशिबी ठरलेल्या इंग्लंडच्या संघाची कर्णधार हेदर नाईट हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. “अशा पद्धतीने स्पर्धेबाहेर होणं खूपच तापदायक आहे. अशा प्रकारे आमचे आव्हान संपवणे आम्हाला अपेक्षित नव्हते. उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस नाही. खेळण्याची संधीही मिळाली नाही. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या पराभवाचा फटका आम्हाला बसला. साखळी सामन्यातील पहिल्या पराभवानंतर आम्हाला काहीही करून उपांत्य फेरी गाठायची होती. आम्ही ते करून दाखवलं. पण हवामानाचं कारण देत आम्हाला स्पर्धेतून बाहेर काढणं हे खूपच क्लेशदायक आहे”, अशा शब्दात नाईट हिने संताप व्यक्त केला.

WT20 World Cup 2020 IND vs ENG : पावसाने काढली इंग्लंडची विकेट; भारत प्रथमच अंतिम फेरीत

“साखळी फेरीत आम्ही शेवटच्या काही सामन्यात चांगला खेळ केला होता. आमच्या संघातील खेळाडू कामगिरी उंचावून उपांत्य फेरीत पोहोचले होते. फिरकीपटूंनी या सामन्यासाठी खूप परिश्रम घेतले होते. ग्लेन, सोफी साऱ्यांनीच चांगली कामगिरी केली होती. नवोदित मॅडीनेही दमदार कामगिरी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नवा स्टार दिला. त्यामुळे आता सुरूवातीपासूनच सामने जिंकायला हवे”, असे उपहासात्मक टिपणी तिने केली.