तब्बल चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम गुरुवारपासून सुरू होणार आहे. भारत या विश्वचषक स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानला जात आहे. परंतु भारताबरोबरच मायदेशातील खेळपट्टय़ा, चाहत्यांचा पाठिंबा आणि गेल्या वर्षभरातील दिमाखदार कामगिरीमुळे इंग्लंडला देखील विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

२०१५च्या विश्वचषकात इंग्लंडला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला होता. मात्र २०१७च्या चॅम्पियन्स करंडकानंतर यंदा नव्या दमाच्या खेळाडूंसह इंग्लंडने कर्णधार ईऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली मोर्चेबांधणी केली. विशेषत: फलंदाजीत इंग्लंडने जवळपास अनेक विक्रम मोडीत काढून भल्याभल्या गोलंदाजांना पाणी पाजले आहे. जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, जो रूट, जेसन रॉय व स्वत: मॉर्गन कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता बाळगून आहेत. गोलंदाजीतही त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर, लिआम प्लंकेट आणि ख्रिस वोक्स यांसारखे हुकमी एक्के आहेत. या पार्श्वभूमीवर विचार करता इंग्लंडचा संघ विश्वचषक विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.

या विश्वचषकाचा माहोल इंग्लंड संघासाठी अनुकूल असला तरीही इतिहासात डोकावल्यास १९७५ ते २०१५ या ४४ वर्षांत झालेल्या ११ विश्वचषकांपैकी फक्त भारत(२०११), ऑस्ट्रेलिया (२०११) आणि श्रीलंका (१९९६) या तीनच संघांना घरच्या मैदानावर जेतेपद पटकावता आले. इंग्लंडने आतापर्यंत चार वेळा विश्वचषकाचे यजमानापद भूषवले आहे. १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ मध्ये इंग्लडने यजमानापद भूषवले मात्र यापैकी एकाही स्पर्धेत त्यांना विजेतेपदावर आपले नाव कोरता आले नाही. पण यावेळी दर्जेदार फलंदाज व यष्टीवेध गोलंदाजांमुळे इंग्लंडचा संघ गेल्या संतुलीत आणि मजबूत संघ दिसतोय. यंदाचा इंग्लंडचा संघ गेल्या २० वर्षातील सर्वात मजबूत संघ वाटतेय. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ विजेतेपदावर नाव कोरु शकेल का? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडचा संघ विजेतेपदावर नाव कोरु शकेल का? याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागल्या आहेत.