‘‘आयुष्यात जिंकणे हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची नसते, तर लढणे ही असते. प्रतिस्पध्र्याला हरवणे यापेक्षा विजय मिळवण्यासाठी ईर्षेने झगडणे, हे खेळासाठी अत्यावश्यक असते!’’.. आधुनिक ऑलिम्पिकचे जनक बॅरेन पीअर डी कुबेर्तिन यांनी हा विचार मांडला, त्याला आता शेकडो वष्रे उलटली आहेत. आता मैदानाच्या पलीकडे जाऊन क्रीडा मानसशास्त्र, कामगिरी सुधरवणारे प्रशिक्षक अशा अनेक गोष्टी खेळांना समृद्ध करीत असतानाही कुबेर्तिन यांच्या विचारांची आठवण क्रीडा क्षेत्राला करून देण्याची वारंवार गरज भासते आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडने ३-० अशा फरकाने रुबाबात अ‍ॅशेसवर नाव कोरले. परंतु ‘सभ्य गृहस्थांचा खेळ’ असे बिरूद मिरविणाऱ्या या क्रिकेटच्या जन्मदात्यांनी विजयाच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाच्या भरात खेळाला काळिमा फासला. सामन्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ पार पडला आणि प्रेक्षागृह रिकामे झाल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंची द ओव्हलच्या मैदानावरच ओली पार्टी रंगली. काळोखाच्या सान्निध्यात, चांदण्यांच्या प्रकाशात ओव्हलच्या हिरवळीवर इंग्लिश खेळाडू आपल्या परंपरागत प्रतिस्पध्र्याना नामोहरम केल्याचा आनंद मद्यासोबत साजरा करीत असल्याचे छायाचित्र मॅट प्रायरने ‘ट्विटर’वर टाकले. पण त्यासोबत ‘अ‍ॅशेसमधील सर्वोत्तम क्षण’ असे नमूद करायला तो विसरला नाही. अ‍ॅशेस जिंकल्याच्या आनंदात मदहोश झालेल्या इंग्लिश खेळाडूंच्या नसानसांत मद्याची ही नशा इतकी भिनली की, ते तारतम्य हरपून बसले. त्यानंतर केव्हिन पीटरसन, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्यासाठी ओव्हलचे मैदानच जणू शौचालय झाले. याचे साक्षीदार असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांनी हा क्षण मग अधिक रंगवला. सामन्यानंतर कप्तान अ‍ॅलिस्टर कुक आणि मॅट प्रायर रस्त्यावर झिंगतानाचे छायाचित्रही या खेळाडूंनी स्वत:च ‘ट्विटर’वर प्रसारित केले होते. बहुतांशी देशांमधील खेळाडूंमध्ये मैदानाला मंदिराचे स्थान असते. त्यामुळे मैदानाचा अनादर केल्याच्या या कृत्यामुळे क्रिकेटविश्वात संतापाची लाट उसळल्यानंतर इंग्लिश खेळाडूंनी आपला माफीनामा सादर केला. परंतु इंग्लंडचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांची प्रतिक्रिया मात्र खेळाडूंच्या कृत्याची पाठराखण करणारीच होती. ते म्हणाले होते, ‘‘छान, आमच्याकडे साजरा करण्यासाठी किमान अ‍ॅशेसची विजयश्री तरी आहे.. यासारख्या फालतू गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा कसोटी मालिकेविषयी आपण चर्चा करूया का?’’ फ्लॉवर यांची मुक्ताफळे इंग्लंड संघाला प्रोत्साहन देणारीच आहेत. ऑस्ट्रेलियाला अ‍ॅशेसमध्ये हरवल्याच्या वीररसाने मग इंग्लंडचा माजी कर्णधार आणि क्रिकेटसमीक्षक मायकेल वॉनही प्रेरित झाला. त्यानेही ‘ट्विटर’चा सहारा घेत एकीकडे ओव्हल क्रिकेट मैदान तर दुसऱ्या चित्रात याच मैदानाचे रूपांतर शौचाच्या कुंडीत केल्याचे कल्पनाचित्र साकारले. इंग्लंडच्या ‘थ्री इडियट्स’च्या या घृणास्पद कृतीकडे वॉनने अत्यंत विनोदबुद्धीने पाहिले होते. परंतु इतक्यावरच तो थांबला नाही, तर त्याने भारतीय क्रिकेट संघालाही इशारा दिला. ‘ट्विटर’वरच त्याने म्हटले होते की, ‘‘ओव्हलवर खेळ संपल्यावर पर्जन्यवृष्टी झाली. पुढील हंगामात भारतीय संघ येणार असल्यामुळे इंग्लंडने खेळपट्टी तयार करण्यास आतापासूनच प्रारंभ करायला सुरुवात केली आहे.’’
मद्याच्या नशेमुळे इंग्लिश खेळाडू बहकल्याचे हे काही पहिलेच उदाहरण नव्हते. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यावरसुद्धा अशा अनेक घटना समोर येतात. काही दिवसांपूर्वीच नाइट क्लबमधून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ इंग्लंडचा गोलंदाज मॉन्टी पनेसार याने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मूत्रविसर्जन केले होते. २००५मध्ये अ‍ॅशेस जिंकल्याच्या अत्युच्च आनंदात अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ आणि केव्हिन पीटरसन गळ्यात गळे घालून डाउनिंग स्ट्रीटला गेले. तिथे या दोघांनी रात्रभर मद्याचा सामना करीत भागीदारी रचली. त्यानंतर याच नशेत फ्लिन्टॉफने रोझ गार्डनमध्ये मूत्रविसर्जन केले होते. परंतु त्याने मात्र आपल्यावरील आरोप फेटाळले होते. २००७मध्ये फ्लिन्टॉफचाच आणखी एक मद्यनामा चर्चेत आला होता. पहाटेच्या वेळी त्याला समुद्रातून वाचवण्यात आले होते. तर वानखेडे स्टेडियमवर याच फ्लिन्टॉफने आपला टी-शर्ट काढून इंग्लंडचा विजय साजरा केला होता. त्यानंतर सौरव गांगुलीने त्याचा बदला घेतला होता, ही आख्यायिका सर्वश्रुतच आहे.
केवळ इंग्लंडचेच खेळाडू तेवढे खराब आणि बाकीचे चांगले असे म्हणायलाही क्रिकेटमध्ये जागा नाही. सप्टेंबर महिन्यात चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्यानंतर बर्मिगहॅममधील एका बारमध्ये ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडच्या जो रूटला ठोसा लगावला होता. यासारखी अनेक प्रकरणे क्रिकेटमध्ये गाजली आहेत. न्यूझीलंडचा फलंदाज जेस्सी रायडरवर काही महिन्यांपूर्वी एका बारबाहेर प्राणघातक हल्ला झाला होता. परंतु सुदैवाने तो बचावला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे(आयसीसी)ने विजय साजरा करण्यासंदर्भातसुद्धा आता मार्गदर्शक तत्त्वे बाळगण्याची गरज आहे, हेच या ताज्या उदाहरणांतून स्पष्ट होत आहे. परंतु माणूस हा उत्सवी प्राणी. कोणत्याही क्षणाचा उत्सव केल्याशिवाय त्याचा आनंद मनापासून साजरा होत नाही. साजरा करण्याची हीच नीती व्यक्तीला अध:पतनाकडे घेऊन जाते. जितकी लोकप्रियता अधिक, जितका पैसा अधिक, ग्लॅमर अधिक तितक्याच प्रमाणात हे साजरा करण्याच्या नशेला अधिष्ठानही मोठे. इंडियन प्रीमियर लीग स्पध्रेमुळेच भारतीय क्रिकेट या वाटेवर गेल्याचे प्रामुख्याने लक्षात येते. २००८मध्ये जेव्हा आयपीएलचा श्रीगणेशा झाला, तेव्हा हरभजन सिंगने एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली होती. या वर्षीच्या आयपीएलमध्ये तर गौतम गंभीर आणि विराट कोहली हे दिल्लीमधीलच दोन खेळाडू एकमेकांशी भिडले होते. याचप्रमाणे जुलै महिन्यात एका तिरंगी क्रिकेट स्पध्रेत रवींद्र जडेजाने सुरेश रैनाला ‘तू कप्तान होण्याची संधी गमावलीस, आता क्षेत्ररक्षणातील रसही गमावलास का?’ असा सवाल केल्यामुळे मैदानावरच या दोघांमध्ये हमरीतुमरी झाली होती. त्यामुळे तारतम्य गमावण्याची मक्तेदारी ही फक्त आता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडेच नाही, हेच सिद्ध होते आहे.
‘‘ जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडते, तेव्हा सर्वाना पुढे ठेवत त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून नेतृत्व करणे उत्तम. परंतु जेव्हा कठीण परिस्थिती ओढवते, तेव्हा तुम्ही पुढे सरसावून उभे राहायला हवे, तरच लोक तुमच्या नेतृत्वाचे कौतुक करतात,’’ असे दक्षिण आफ्रिकेचे शांतिदूत नेल्सन मंडेला म्हणतात. भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी त्यांच्या याच वाक्याचे तंतोतंत पालन करतो. दोनदा विश्वचषक आणि भारताला कसोटी, एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल स्थान मिळवून दिल्यावरही त्याचे पाय जमिनीवरच होते. शांत डोक्याच्या धोनीने त्याच्या कारकीर्दीतील हे सारे क्षण अतिशय संयमाने साजरे केले. खेळाचा हाच आदर्शवाद खेळाडूंनी जोपासण्याची गरज आहे.