भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साऊथम्प्टन येथे सुरू असलेल्या वर्ल्ट टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी दोन प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढण्यात आले. हे दोन्ही प्रेक्षक भारतीय आहेत. त्यांच्यावर न्यूझीलंड क्रिकेट संघ, विशेषत: फलंदाज रॉस टेलरविरूद्ध वांशिक भाष्य केल्याचा आरोप होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सरव्यवस्थापकांनी (जीएम) ट्वीटद्वारे या कारवाईची माहिती दिली.

आयसीसीच्या जीएमला टॅग करत डोमिनिक डा सूजा नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने आपल्या देशातील खेळाडूंवर वांशिक भाष्य केल्याची तक्रार केली. त्याने लिहिले, ”नमस्कार मित्रांनो, प्रेक्षकांच्या वर्तनाची काळजी घेण्यासाठी कोणी मैदानात आहे का? येथे एक व्यक्ती न्यूझीलंड संघाविरूद्ध शिवीगाळ करत आहे. दिवसभर हे गैरवर्तन केले गेले आहे. अगदी रॉस टेलरविरोधात वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या गेल्या.” यानंतर आयसीसीच्या जीएमने कारवाई केली. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आणि गैरवर्तन करणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढले.

हेही वाचा – VIDEO : केन विल्यमसनची संथ फलंदाजी पाहून सेहवागने शेअर केला श्वानाचा व्हिडिओ

क्लेअर यांनी ट्वीट करुन या कारवाईची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ”दोन लोकांची ओळख पटली आहे आणि  वाईट वागणुकीमुळे त्यांना स्टेडियमबाहेर काढण्यात आले आहे. जेरोड किम्बर आणि माझ्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आम्ही खेळात अशा प्रकारच्या वर्तनास समर्थन देत नाही.”

 

भारत पराभवाच्या छायेत

या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. काल २ बाद ६४ अशा धावसंख्येवरून पुढे खेळताना आज सहाव्या दिवशी भारताने कोहली आणि पुजाराला स्वस्तात गमावले आहे. पहिल्या डावात विराटला बाद केलेल्या काईल जेमीसनने दुसऱ्या डावातही त्याला तंबूचा मार्ग दाखवला. जेमीसनने विराटला पायचित पकडले. विराटला १३ धावा करता आल्या. विराटपाठोपाठ जेमीसनने अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला यष्टीपाठी झेलबाद करत अजून एक हादरा दिला. पुजाराला १५ धावा करता आल्या.