अमेरिकन अधिकाऱ्यांकडून फिफावर निशाणा साधण्याच्या प्रयत्नाने अचंबित केल्याचे मत व्यक्त करून युरोपियन फुटबॉल महासंघाकडून (युएफा) चालविण्यात आलेल्या ‘विरोध मोहिमे’वर  फिफाचे अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी पलटवार केला. अमेरिकन पोलिसांनी लाच घेतल्याच्या संशयाखाली फिफाच्या अधिकाऱ्यांना केलेली अटक ही फिफाच्या बैठकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचे ठाम मत ब्लाटर यांनी स्वित्र्झलड येथील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून मांडले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शनिवारी ब्लाटर आणि फिफाच्या कार्यकारणी समितीची बैठक पार पडली. त्यात कतारमध्ये होणाऱ्या २०२२च्या विश्वचषक स्पध्रेसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. याच दरम्यान अमेरिकेच्या पोलिसांनी तपासाअंती आणखी अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर ब्लाटर यांनी  फिफाच्या कारभारात जाणीवपुर्वक हस्तक्षेप केला जात असल्याचे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘‘ २०२२च्या विश्वचषक स्पध्रेच्या आयोजनासाठी अमेरिका उत्सुक होती आणि पण ते पराभूत झाले. त्यामुळे अमेरिका ही कारवाई करत आहे. फिफा अध्यक्षपदासाठी उभे राहिलेल्या प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना अमेरिकेचा आणि युरोपियन फुटबॉल महासंघाचा पाठींबा होता.’’  
अमेरिकेचे न्यायाधिश अ‍ॅटर्नी जनरल लॉरेट्टा लिंसी यांनी भ्रष्टाचार हा फुटबॉलच्या मुळापर्यंत गला असल्याचा आरोप केला होता, तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी ‘फसवणूकीचा विश्वचषक’ असा उल्लेख केला होता. त्यावर ब्लाटर यांनी नाराजी व्यक्त केली. अमेरिकन पोलिसांनी केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत फिफाच्या नऊ अधिकाऱ्यांसह १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. त्यात फिफाच्या दोन उपाध्यक्षांचा समावेश असून तपासअधिकारी रिचर्ड वेबर यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आणखी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली. या कारवाईनंतर युएफाचे अध्यक्ष मिचल प्लॅटीनी यांनी ब्लाटर यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. ब्लाटर त्यावर म्हणाले, ‘‘ मी सर्वाना माफ करेन, परंतु यातील काहीच विसरणार नाही.’’
मी परिपूर्ण नाही, तसे कुणीच नसते. मात्र, आपण सर्वानी एकत्रितपणे सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.
– सेप ब्लाटर