विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत जर्मनीने यजमान ब्राझीलचा पालापाचोळा केला. या मानहानीकारक पराभवाचे अतितीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. जर्मनीच्या अद्भुत वर्चस्वाची आणि ब्राझीलच्या अनपेक्षित घसरगुंडीवर विक्रमी असे तब्बल ३५.६ दशलक्ष ‘ट्विट’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘ट्विटर’च्याच कुटुंबीयातील ‘फेसबुक’वरही ब्राझीलच्या पानिपतावरून प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. सामन्यादरम्यान आणि त्यानंतरच्या काही तासांत २०० दशलक्ष पोस्ट फेसबुकवर शेअर झाल्या आहेत. पोस्ट, शेअरिंग, प्रतिक्रिया आणि लाइक्स मिळून ६६ दशलक्ष नेटिझन्सनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि ही विक्रमी संख्या आहे.
जर्मनीच्या सॅमी खेदिराने २९व्या मिनिटाला केलेल्या गोलने ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’वर नेटिझन्समध्ये अचानक उधाण आले. या गोलनंतर अवघ्या मिनिटभरात ५८०००० ‘ट्विट’स केले गेले. नेयमारच्या अनुपस्थितीमुळे ब्राझीलचे मनोधैर्य एवढे कसे खचले, हा प्रश्न बहुतांशी नेटिझन्सनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
‘‘ब्राझीलचा नेयमार, अर्जेटिनाकडे लिओनेल मेस्सी, पोर्तुगालकडे ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे, पण जर्मनीकडे संघ आहे,’’ या सूत्राला लोकमान्यता मिळाली. प्रत्यक्ष मैदानावर थरार सुरू असताना सोशल मीडियामध्ये रंगणारे वाग्युद्धही तितकेच रंजक आहे.
जर्मनीचा संघ नियमित अंतराने गोल करत होता आणि सोशल मीडियावर जर्मनीच्या चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. प्रतिस्पध्र्याला पूर्णत: बेचिराख करणारी ‘ब्लिट्सक्रीग’ ही प्रणाली जर्मनीने जगाला दिलेली देणगी. या प्रणालीचा प्रयोग ब्राझीलवर केल्याचे जर्मन चाहत्यांचे म्हणणे होते. जर्मनी विजय मिळवेल, पण तो इतका दणदणीत असेल, यावर बऱ्याच चाहत्यांचा विश्वास बसत नव्हता.
दुसरीकडे ब्राझीलच्या चाहत्यांना या दारुण पराभवाने धक्का बसल्याचे जाणवत होते. ‘‘हरणे खेळाचा भाग आहे, मात्र असे गिनीज बुकात नोंद होईल अशा पद्धतीने हरू नका,’’ अशी मार्मिक टिप्पणी ब्राझीलच्या चाहत्याने केली. नेयमारच्या अनुपस्थितीमुळे ब्राझीलचाच कणा मोडला, ही प्रतिक्रिया ब्राझीलचे पतन दर्शवण्यासाठी पुरेशी बोलकी होती.
‘‘हा विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना आहे की एखादा क्लब दर्जाचा सराव सामना?’’ अशा शब्दांत सातत्याने आपल्या संघाविरुद्ध होणाऱ्या गोलने हैराण ब्राझीलच्या चाहत्याने आपल्या भावना मांडल्या. ‘‘जर्मनीचे सर वर्गात येतात आणि ब्राझिलियन मुले दचकून उभी राहतात व म्हणतात, १-७ नमस्ते!’’ अशी टिपण्णीही ब्राझीलच्या पराभवाची करण्यात आली आहे. ‘‘टाळ गेला चिपळी गेली, अभंगाची माळ तुटली, जर्मनीच्या गोल रिंगणात ब्राझीलची वारी संपली,’’ असा संदेशही आषाढी एकादशीच्या निमित्ताने फिरत होता.
सोशल मीडियाच्या सर्वसमावेशक जगव्यापी स्वरुपामुळे ब्राझील-जर्मनी मुकाबल्याच्यावेळी आनंद, जल्लोष, दु:ख, निराशा अशा विविध भावनांचे हिंदोळे अनुभवता येत होते.