दोहा : गोलमशीन सुनील छेत्री याला जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या अव्वल १० खेळाडूंच्या यादीत स्थान पटकावण्याची संधी आहे. भारताचे २०२२ फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीत स्थान पटकावण्याचे आव्हान संपुष्टात आले असले तरी अखेरची पात्रता लढत मंगळवारी अफगाणिस्ताशी होणार आहे.

भारताला आशियाई चषकातील पात्रता लढतींच्या तिसऱ्या फेरीत मजल मारण्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धची लढत बरोबरीत सोडवावी लागणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या गेल्या सामन्यात दोन गोल झळकावत भारताला पहिला विजय मिळवून दिला होता. आता अफगाणिस्तानविरुद्ध एक गोल लगावल्यास, तो देशातर्फे सर्वाधिक गोल करणाऱ्या जगातील अव्वल १० जणांमध्ये स्थान पटकावेल.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. या सामन्यात पराभव टाळल्यास, भारतीय संघ ई गटात तिसऱ्या क्रमांकावर मजल मारेल. बांगलादेशविरुद्ध चमकदार कामगिरी केल्याने भारताचा आत्मविश्वास उंचावला असून प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी छेत्री आणि मनवीर सिंग यांना आघाडीला खेळण्याचे ठरवले आहे. त्यांना मधल्या फळीत ब्रँडन फर्नाडेसची साथ लाभेल.

’ सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, ३