फिफा विश्वचषक पात्रता फेरी

एडिसन कवानी आणि लुइस सुआरेझ यांच्या दिमाखदार गोलमुळे उरुग्वेने फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीत कोलंबियावर ३-० असा विजय मिळवला.

तीन सामन्यानंतर उरुग्वे चौथ्या स्थानी असून मंगळवारी त्यांच्यासमोर ब्राझीलचे आव्हान आहे. कवानीने पाचव्याच मिनिटाला गोल करत उरुग्वेला चांगली सुरुवात करून दिली. त्यापाठोपाठ सुआरेझने (५४व्या मिनिटाला पेनल्टीवर) आणि डार्विन नुरीझने (७३वे मिनिट) उरुग्वेच्या विजयात योगदान दिले.

उरुग्वेच्या संघात गोलरक्षक मार्टिन सिल्वा, सेबॅस्टियन कोएट्स, फेडेरिको वॅलवर्डे आणि मॅक्सी गोमेझ या महत्त्वपूर्ण खेळाडूंची अनुपस्थिती होती. मात्र तरीदेखील त्यांनी सरस कामगिरी केली.

ब्राझीलचा सलग तिसरा विजय

साव पावलो : ब्राझीलने फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीत व्हेनेझुएलावर १-० मात करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. रॉबर्ट फर्मिनोने ६७व्या मिनिटाला दुसऱ्या सत्रात केलेला गोल ब्राझीलच्या विजयात मोलाचा ठरला. ब्राझीलने याआधीच्या दोन पात्रता फेऱ्यांच्या लढतीत मिळून ९ गोल नोंदवले होते. त्या तुलनेत व्हेनेझुएलाविरुद्ध मात्र त्यांना गोल करण्यासाठी संघर्ष करावा लागला. दक्षिण अमेरिकेच्या एकूण १० संघांमधून अद्याप व्हेनेझुएला हा एकमेव संघ विश्वचषकासाठी कधीही पात्र ठरलेला नाही. मात्र त्यांनी ब्राझीलला सहज विजय मिळवू दिला नाही. ब्राझीलच्या उरुग्वेविरुद्ध होणाऱ्या  पुढील लढतीतून अव्वल खेळाडू नेयमारने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. नेयमार व्हेनेझुएलाविरुद्धच्या लढतीलाही दुखापतीमुळे मुकला होता.

क्रोएशियाचा मार्सेलो करोनाबाधित

स्टॉकहोम : क्रोएशियाचा मार्सेलो ब्रोझोविच हा फुटबॉलपटू करोनाबाधित आढळला आहे. स्वीडनविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी ब्रोझोविचचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला. २७ वर्षीय ब्रोझोविच इंटर मिलानकडून खेळतो. त्याने तातडीने स्वत:चे विलगीकरण केले आहे. लवकरच  त्याची दुसरी चाचणी होणार आहे.