रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला दीपा मलिक हिचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दीपा मलिक हिने पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला रौप्य पदकाची कमाई करून दिली होती. यापूर्वी कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली नाही. दीपाच्या कामगिरीची दखल घेत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, राज्याचे क्रीडा मंत्री अनिल विज आणि राज्यपाल कप्तान सोलंकी यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ कोटींचा धनादेश पारितोषिक स्वरुपात देण्यात आला.

हरियाणातील मुलींनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे केले आहे. हरियाणातील प्रत्येक नागरिकाने मुलीला वाचविण्याची प्रतिज्ञा करावी. राज्यातील प्रत्येक मुलीच्या संरक्षण आणि शिक्षणाची जबाबदारी आपली आहे, असे मोदी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. राज्यातील स्त्री-पुरूष जन्मदरात सुधारणा झाल्याची दखल घेत मोदींनी हरियाणाचे कौतुक देखील केले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेला चांगले यश मिळाले असून हरियाणा देखील या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहे. आगामी काळात हरियाणा विकासाची नवी उंची गाठेल, असे मोदी म्हणाले.