सलामीच्या षटकांमध्ये पॉवर प्ले असताना आक्रमक फलंदाजी करायची आणि जास्तीत जास्त धावा काढायच्या हे तंत्र अमलात आल्यानंतर घणाघाती फलंदाजी करणाऱ्यांना विशेष मागणी आली. आक्रमकता हा विशेष गुण मानला जाऊ लागला, मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण. डावाच्या सुरूवातीलाच जे चौकारांची व षटकारांची बरसात करतात ते प्रतिस्पर्ध्यांना सावरायची संधीच देत नाहीत त्यामुळे त्यांना विषेष महत्त्व प्राप्त झालं.
एका दशकापूर्वी एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक झळकावलं जाऊ शकतं असा विचारही कुणाच्या मनाला शिवला नव्हता. आता मात्र 50 षटकांमध्ये 400 धावांचं काही विशेष वाटत नाही. फलंदाजांचा खेळ झालेल्या या क्रिकेटमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारे अनेक सलामीचे फलंदाज आहेत. त्यातले हे सगळ्यात जास्त धोकादायक व सध्या खेळणारे फलंदाज…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरॉन फिंच

ऑस्ट्रेलियासाठी अनेक नेत्रदीपक खेळी केलेला फिंच मर्यादित षटकांच्या खेळात निपुण मानला जातो. बहुतेक सगळ्या देशांच्या गोलंदाजांच्या त्यानं चिंध्या उडवल्या आहेत. फिरकीपटूंच्या सहसा नादी न लागण्याचं धोरण फिंचला पसंत नाही. तो फिरकबपटूंवरही तुटून पडतो. डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ संघात नसताना एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची धुरा आक्रमक शैलीच्या फिंचवरच आहे.

 

मार्टिन गपटिल

जगात फारशी चर्चा न झालेला व कौतुक पदरात न पडलेला गुणी खेळाडू म्हणजे न्यूझीलंडचा मार्टिन गपटिल. अत्यंत सफाईनं मैदानाबाहेर चेंडू धाडण्यात सगळ्यात पुढे असलेला हा फलंदाज आहे. गोलंदाजांना वा क्षेत्ररक्षकांना फारशी संधी न देता चेंडू सीमारेषेपार करणं ही त्याची खासियत.
31 वर्षांच्या गपटिलनं 150पेक्षा जास्त एकदिवसीय सामने खेळले असून त्याची सरासरीही 43 अशी आकर्षक आहे. त्यानं एक द्विशतकही झळकावलं आहे. मागच्या काही काळात न्यूझीलंडच्या यशामागे गपटिलची आक्रमक घणाघाती फलंदाजी हे कारण आहे.

 

जेसन रॉय

इंग्लंडला गेला काही काळ कुणी गांभार्यानं घेत नव्हतं. पण 2015 त्या वर्ल्ड कपनंतर इंग्लंडनही आक्रमक क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. यामध्ये मोलाची भूमिका निभावली जेसन रॉयनं. डावाच्या पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास जेसन उत्सुक असतो. मैदानाबाहेर चेंडू फेकून देण्याची त्याची क्षमता वादातीत असून त्यामुळेच गोलंदाजही त्याला बिचकून असतात.

 

फखर झमान

2017च्या चँपियन ट्रॉपीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करताना फखरनं झंझावाती खेळी केली होती. तोपर्यंत कुणाच्या नजरेत न आलेल्या फखरनं नंतर मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं. डावखुरा असलेल्या फखरनं एकदिवसीय सामन्यांत सगळ्यात जलद 1000 धावा करण्याचा विक्रमही केलाय. एदकिवसीय सामन्यात द्विशतक झळकावणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे.

 

रोहित शर्मा

मधल्या फळीतील फलंदाज म्हणून करीअरची सुरूवात करणारा रोहित शर्मा यथावकाश भारताचा सलामीचा फलंदाज झाला. 2013 च्या चँपियन ट्रॉफीमध्ये त्याला सलामीला खेळवण्यात आलं. त्याच्या करीअरसाठी तो महत्त्वाचा क्षण ठरला. भारतासाठी काही अत्यंत निर्णायक खेळी करणारा रोहित आता भारताचा भरवशाचा सलामीचा फलंदाज आहे.
तो भरात असेल तर जगातल्या कुठल्याही गोलंदाजीच्या चो चिंधड्या उडवू शकतो अशी त्याची ख्याती आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन द्विशतकं झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे, यावरून त्याची धावांची भूक किती आहे लक्षात येतं. सध्यातरी तो जगातला सगळ्यात धोकादाय आघाडीचा फलंदाज आहे यात शंका आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five most destructive opening batsmen in one day cricket
First published on: 23-07-2018 at 12:59 IST