महाराष्ट्राच्या संघावर शिस्तपालन समितीकडून कारवाई; सायली, स्नेहल आणि गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी

महाराष्ट्राच्या महिला संघाचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आव्हान साखळीतच संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पाच जणांवर महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. या समितीने प्रशिक्षक राजू भावसार आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली आहे, तर कर्णधार सायली केरिपाळे, स्नेहल शिंदे आणि व्यावस्थापिका मनीषा गावंड यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याचप्रमाणे संघातील अन्य नऊ खेळाडूंना ताकीद देण्यात आली आहे.

रविवारी राज्य कबड्डी संघटनेच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयात शिस्तपालन समितीचे अध्यक्ष देवराम भोईर आणि सचिव मंगल पांडे यांनी महाराष्ट्राच्या महिला संघाची कसून चौकशी केली. यात खेळाडूंची लेखी कारणमीमांसा परीक्षासुद्धा घेण्यात आली. त्यानंतर उपलब्ध माहिती आणि सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे शिस्तपालन समितीने महाराष्ट्राच्या पराभवाबद्दल या पाच जणींवर प्रमुख ठपका ठेवला आहे.

भावसार आणि गावंड यांच्यासहित पुण्याच्या तीन वरिष्ठ खेळाडूंवर शिस्तपालन समितीने चौकशीअंती जवळपास १० आरोप ठेवलेले आहेत. भावसार यांना प्रशिक्षकाची जबाबदारी योग्य रीतीने निभावली नाही आणि संघाला पराभवासाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दीपिका, सायली आणि स्नेहल या खेळाडूंची वागणूक बेशिस्त होती. याचप्रमाणे गावंड यांच्याकडून व्यवस्थापिकेची भूमिका बजावताना निष्काळजीपणा आढळून आला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.