माजी विश्वविजेत्या जर्मनीच्या फुटबॉल संघातील अटॅकिंग मिडफिल्डर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेसूट ओझील याने तडकाफडकी अत्यंत टोकाचा निर्णय घेतल्यामुळे सध्या फुटबॉल विश्वात खळबळ माजली आहे. टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतल्यानंतर ओझीलवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. ज्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे.

टर्की देशाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत ओझिलचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला होता. ज्यानंतर त्याला देशाभिमान नाही, अशी टीकाही करण्यात आली होती. तसंच ओझील हा मूळचा टर्कीश वंशाचा असल्यामुळेही जर्मनीच्या फुटबॉल प्रमुख ऑलिव्हर बाइरहॉफ यांनीही त्याच्यावर टीकास्र सोडलं होतं. एदरेगन यांच्यासमवेत झालेल्या भेटीबाबत ओझीलने कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. याचविषयी आता मौन सोडत यापुढे जर्मनी संघाकडून फुटबॉल खेळणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय ओझीलने घेतला आहे. सोबतच त्याने जर्मन फुटबॉल संघाच्या अध्यक्षांवरही टीका केली आहे.

वाचा : भारतीय फुटबॉल महासंघाच्या बैठकीत ऑलिम्पिक संघटनेचा निषेध

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकामध्ये जर्मनीच्या संघाला सुरुवातीलाच माघार घ्यावी लागली होती. आतापर्यंतच्या इतिहासाच जर्मनीच्या संघाच्या वाट्याला आलेली ही हार फुटबॉल रसिकांना सर्वाधिक वेदना देणारी ठरली होती. या पराभवानंतर ओझीलवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यातच टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या फोटोनंतर त्याच्यावर वर्णद्वेषाचीही टीका झाली. आपल्याविरोधात ठाकलेल्या या सर्व वातावरणानंतर त्याने संघातूनच काढता पाय घेतला.

‘मी एक फुटबॉल खेळाडू आहे, राजकीय नेता नाही. आमची (टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांसोबतची) भेट ही कोणत्याही राजकीय हेतूने झाली नव्हती. जर्मन फुटबॉल महासंघाकडून मला मिळालेली वागणून पाहता आता यापुढे मी जर्मनीच्या फुटबॉल संघातून न खेळण्याचा निर्णय घेत आहे. मला पाण्यात पाहिलं जात असून, २००९ पासून मी करिअरमध्ये जे यश संपादन केलं आहे, त्याचा सर्वांनाच विसर पडला आहे’, असं म्हणत ओझीलने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची खंत व्यक्त केली. त्यासोबतच फुटबॉल महासंघामध्ये वर्णभेदाला दुजोरा देणाऱ्यांना जागा दिली जाऊ नये, असंही त्याने म्हटलं आहे. देशाचा फुटबॉल संघ एखाद्या सामन्यात विजयी ठरतो, तेव्हा मी त्या देशाचा खेळाडू असतो. पण, त्याच संघाची जेव्हा हार होते तेव्हा मात्र मी निर्वासित होतो, असं म्हणत ओझीलने त्याच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्याच्या या निर्णयामुळे सध्या संपूर्ण क्रीडा विश्वातून अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत असून, सोशल मीडियावरही याविषयीची चर्चा सुरु आहे.