एपी, जेनिव्हा

सुपर लीग फुटबॉलच्या आयोजनाचा डाव गुंडाळावा लागण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असल्याने आता चॅम्पियन्स लीगच्याच स्वरूपात बदल करून ती स्पर्धा अधिक आकर्षक आणि रंगतदार करण्याचा युरोपियन फुटबॉल संघटनेचा प्रयत्न आहे.

अधिकाधिक आर्थिक कमाईच्या उद्देशाने २० संघांसह सुपर लीग खेळवण्यासाठी युरोपियन संघटना प्रयत्नशील होती; परंतु बार्सिलोना आणि रेयाल माद्रिदला वगळल्यास १० बलाढ्य संस्थापक संघांनी या लीगला विरोध दर्शवला. त्यामुळे सुपर लीगचे आयोजन तूर्तास अशक्य दिसत आहे. मात्र २०२४च्या चॅम्पियन्स लीगमध्ये संघांची संख्या वाढवून त्यांना प्रत्येकी १० सामने खेळण्याची संधी मिळू शकते.

‘‘गेल्या आठवडाभरात फुटबॉलच्या भवितव्याच्या दृष्टीने कोणती पावले उचलावीत, याविषयी आम्ही विचारविनिमय केला. सुपर लीगचे आयोजन शक्य नसल्यास चॅम्पियन्स लीगचे स्वरूप अधिक रंगतदार करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यामुळे २०२४च्या चॅम्पियन्स लीगमध्ये ३२ ऐवजी ३४ संघांना समावेश देण्याबरोबरच बलाढ्य १२ संघांना दोन गटांत विभागण्याचा आम्ही विचार करत आहोत,’’ असे युरोपियन फुटबॉल क्लब संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ली मार्शल म्हणाले.