भारतीय संघाने न्यूझीलंडवर एकदिवसीय मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत केदार जाधवने अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर यश मिळवले आहे. त्याने दोन सामन्यात कंजूस गोलंदाजी करत मोक्याच्या क्षणी बळी टिपले. यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली याने त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

सौरव गांगुली

 

केदार जाधवमध्ये सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. तो दडपणाच्या परिस्थितीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करू शकतो. आपण त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तशी खेळी करताना पाहिलेदेखील आहे. तो फलंदाज म्हणून उत्तम आहेच. पण तो गोलंदाजीतही उपयुक्त आहे आणि बळी टिपण्यातही तो तरबेज आहे. त्यामुळे धोनी ४थ्या आणि केदार जाधव ५व्या क्रमांकावर अशीच संघाची रचना फायद्याची ठरेल, असे गांगुलीने सांगितले.

दरम्यान, गांगुली शुभमन गिलबाबतही बोलला. तो म्हणाला की शुभमन गिलला संघात स्थान द्यायला हवे. संघासाठी तो योग्य खेळाडू आहे. म्हणूनच त्याला उर्वरित मालिकेत संघात स्थान दिले पाहिजे. कदाचित भारताला विश्वचषकासाठी आणखी एक खेळाडू मिळेल, अशी भविष्यवाणीही गांगुलीने केली.