आठवडय़ाची मुलाखत – शुभांगी कुलकर्णी, भारताच्या माजी क्रिकेटपटू

ऋषिकेश बामणे, लोकसत्ता

मुंबई : सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही ट्वेन्टी-२० चॅलेंज क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाद्वारे भारतातील महिला क्रिकेटला नवचैतन्य देण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केल्यामुळे या स्पर्धेची सर्वानाच उत्सुकता लागली आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या माजी क्रिकेटपटू शुभांगी कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदा भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती येथे ४ ते ९ नोव्हेंबरदरम्यान महिला चॅलेंज ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. मार्चमध्ये झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर प्रथमच भारतीय महिला खेळाडू चाहत्यांना खेळताना दिसणार आहेत. तीन संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय महिला संघाच्या एकंदर प्रगतीविषयी अर्जुन पुरस्कार विजेत्या शुभांगी यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

* करोना साथीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या महिला चॅलेंज स्पर्धेकडे तुम्ही कसे पाहता?

निश्चितच सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीतही या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतल्यामुळे महिला खेळाडूंसाठी ते फार लाभदायक ठरणार आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून सर्वच भारतीय महिला खेळाडू स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहेत. त्यामुळे या स्पर्धेत त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीची कसोटी असेल. पुरुषांच्या ‘आयपीएल’मुळे थोडेफार का होईना नागरिकांचे लक्ष करोनाकडून दुसरीकडे वळाले. त्यामुळे महिलांच्या स्पर्धेकडूनही तीच अपेक्षा आहे. महिला क्रिकेटला एक नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची ठरणार आहे.

* भविष्यात ही लीग अधिक स्पर्धात्मक आणि लोकप्रिय करण्यासाठी कोणते उपाय सुचवाल?

खरे तर महिलांची ‘आयपीएल’ अशा वेळी खेळवण्यात यावी, जेव्हा अन्य देशांतील खेळाडूसुद्धा उपलब्ध असतील. सध्या ऑस्ट्रेलियात महिलांची बिग बॅश लीग सुरू असल्यामुळे बहुतांश खेळाडू तेथे आहेत. त्याशिवाय आपल्या काही खेळाडूंनाही त्या स्पर्धेत यंदा सहभागी होता येणार नाही. महिलांच्या ट्वेन्टी-२० स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून स्थानिक पातळीवर चमक दाखवलेल्या खेळाडूंना संधी मिळते. त्यांच्यासाठी परदेशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव निराळाच असतो. परंतु या वर्षांत सर्वच स्पर्धाचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे सध्या आपल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळत आहे, हीच मोठी गोष्ट आहे. अमिरातीतील खेळपट्टय़ांवर खेळल्यामुळे त्यांच्या खेळात फार सुधारणा होईल. त्याप्रमाणेच भविष्यात शक्य असल्यास स्पर्धेत एकूण चार संघांचा समावेश करून खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियांचे आयोजन केल्यास ते महिला क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल, असे मला वाटते.

* महिला क्रिकेटच्या पायाभूत सुविधांविषयी तुमचे काय मत आहे?

गेल्या काही वर्षांत भारताला अनेक उदयोन्मुख क्रिकेटपटू गवसल्या आहेत. मात्र तरीही पायाभूत सुविधांकडे मोठय़ा प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे, असे मला वाटते. उदाहरणार्थ मुलींकरिता स्वतंत्र क्रिकेटच्या अकादम्या अथवा प्रशिक्षण केंद्रे सुरू करणे गरजेचे आहे. एखाद्या १०-१२ वर्षांच्या मुलीला क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याची इच्छा झाल्यास तिला कमीत कमी अंतरावर त्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यासाठी योग्य प्रशिक्षकासह सर्व सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे.

* एकंदर भारतीय महिला संघाच्या प्रगतीविषयी तुम्हाला काय वाटते?

प्रामाणिकपणे सांगायचे तर, सध्याचा भारतीय संघ नक्कीच सर्वोत्तम आहे. झुलन गोस्वामी, मिताली राज यांसारख्या अनुभवी खेळाडूंबरोबरच शफाली वर्मा, रिचा घोष यांसारख्या प्रतिभावंत युवा खेळाडूही भारताच्या ताफ्यात आहेत. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज यासुद्धा आता परिपक्व झाल्या आहेत. वर्षांच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात, तसेच २०१७च्या एकदिवसीय विश्वचषकात आपले विजेतेपद थोडक्यात हुकले. मात्र लवकरच भारतीय महिला संघ विश्वचषक उंचावेल, याची मला खात्री आहे.