फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष गटात शुक्रवारी ‘एल-क्लासिको’ सामना पाहायला मिळणार आहे. जगातील दोन महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविच आणि फ्रेंच ओपनचा राजा राफेल नदाल उपांत्य फेरीच्या सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. नदालने तब्बल १३ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर, जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी असलेल्या जोकोविचने केवळ एकदाच फ्रेंच ओपन जिंकली आहे. दोनपैकी फक्त एक खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.

‘एल-क्लासिको’ हा स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘उत्कृष्ट’ असा आहे. स्पॅनिश फुटबॉलमध्ये, बार्सिलोना–रियल माद्रिद यांच्यातील सामन्याला एल क्लासिको म्हणतात, कारण दोन्ही ला लीगामधील सर्वात यशस्वी क्लब आहेत. त्याचप्रमाणे नदाल आणि जोकोविच यांच्यातील सामनाही ‘एल-क्लासिको’च म्हणावा लागेल. उद्या शुक्रवारी या दोघांत उपांत्य फेरीची लढत होणार आहे. एकप्रकारे अंतिम सामन्याइतकच महत्त्व या सामन्याला असणार आहे.

हेही वाचा – गेल्या वर्षी करोनाला ‘पंच’ देणारे भारताचे माजी बॉक्सिंगपटू दिनको सिंह यांचे निधन

उपांत्यपूर्व फेरीत नदालला गाळावा लागला घाम

स्पेनच्या राफेल नदालला यंदाच्या स्पर्धेत २०१९नंतर प्रथमच सेट गमवावा लागला. परंतु अनुभवाच्या बळावर तिसऱ्या मानांकित नदालने झोकात पुनरागमन करून सर्वाधिक १४व्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ३५ वर्षीय नदालने उपांत्यपूर्व फेरीत अर्जेटिनाच्या १०व्या मानांकित दिएगो श्वाट्र्झमनवर ६-३, ४-६, ६-४, ६-० अशी चार सेटमध्ये मात केली. या विजयासाठी नदालला दोन तास आणि ४५ मिनिटे संघर्ष करावा लागला.

हेही वाचा  वीरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘‘जर सुविधा असत्या, तर मीसुद्धा कमी वयात….”

दुसरीकडे, बुधवारी खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत ९व्या क्रमांकावर असलेल्या मातिओ बॅरेटिनीला पराभूत करण्यासाठी सर्बियाच्या जोकोविचलाही संघर्ष करावा लागला. जोकोविचने हा सामना ६-३, ६-२, ६-७, ७-५ असा जिंकला. ३ तास २८ मिनिटे असा काळ हा सामना रंगला होता.

दुसर्‍या उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकाचा ग्रीसचा टेनिसपटू स्टीफानोस सितसिपास आणि जर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेव यांच्यात टक्कर होईल.