लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या गगन नारंगने गाबाला, अझरबैजान येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत एअर रायफल प्रकारात अंतिम फेरीत स्थान पटकावले. मानेच्या दुखापतीतून सावरत असलेल्या गगनने पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावले. अंतिम फेरीत पात्रता फेरीतील अव्वल आठ खेळाडू सहभागी होतील.
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राला पात्रता फेरीत १४व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गगन आणि अभिनव दोघेही रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.  दरम्यान, जितू राय, प्रकाश नानजप्पा आणि ओंकार सिंग यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात पात्रता फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांमध्ये, १० मीटर एअर रायफल प्रकारात अपूर्वी चंडेला, पूजा घटकर आणि अयोनिका पॉल यांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात अपयश आले. पूजाला ४१३.८ गुणांसह ३०व्या, अपूर्वीला ४१२.६ गुणांसह ४५व्या तर अयोनिकाला ४११.२ गुणांसह ५७व्या स्थानावर समाधान मानावे लागले.