भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या राजकारणात आपली नवीन इनिंग खेळतो आहे. आपल्या काळात गौतमने आपल्या डावखुऱ्या फलंदाजीने अनेक गोलंदाजांवर प्रहार केला होता. मात्र पाकिस्तानच्या उंचपुरा गोलंदाज मोहम्मद इरफानविरोधात खेळताना गौतम नेहमी चाचपडायचा. खुद्द इरफानने एका मुलाखतीमध्ये याबद्दलची माहिती दिली आहे.

“ज्यावेळी मी भारताविरुद्ध खेळत होतो, त्यावेळी भारतीय फलंदाजांना माझ्या गोलंदाजीवर खेळता येत नव्हतं. माझ्या उंचीमुळे फलंदाजांना चेंडू नेमका कुठून येतोय हे समजणं कठीण जायचं. गौतम गंभीरला मी या मालिकेत ४ वेळा बाद केलं, तो तर माझ्या नजरेला नजर देणंही टाळायचा. गौतम गंभीर अनेकदा माझ्या गोलंदाजीवर खेळणं टाळायचा.” अनेकदा माझा चेंडू किती वेगाने येणार आहे हे देखील फलंदाजांना लक्षात यायचं नाही, काही भारतीय फलंदाजांनी आपल्याकडे ही कबुली दिल्याचं इरफानने सांगितलं.

यावेळी बोलत असताना इरफानने सध्याचा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही आपली गोलंदाजी खेळताना अनेकदा त्रास व्हायचा. विराटला वाटायचं की मी १३०-१३५ च्या वेगाने गोलंदाजी करत असेन मात्र मी १४५ कि.मी. च्या वेगाने गोलंदाजी करत त्याला चकवलं होतं. युवराज एकदा विराटला माझ्या गोलंदाजीवर पूल ऐवजी कट चा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यास सांगितलं होतं. विराटने तसा प्रयत्न केलाही, मात्र तो यष्टीरक्षकाकडे झेल देत माघारी परतला. दरम्यान इरफानच्या या मुलाखतीवर अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूने आपली प्रतिक्रीया दिलेली नाहीये.