धोनी हा आजवरचा भारताला लाभलेला सर्वोत्तम कर्णधार असला तरी संघाच्या विजयाचे संपूर्ण श्रेय धोनीला देणे चुकीचे आहे, असे गंभीर म्हणाला. ‘‘तुम्ही आकडेवारीवर नजर टाकली, तर निश्चितच धोनीचे श्रेष्ठत्व सिद्ध होईल. परंतु इतर कर्णधारांनी सुमार कामगिरी केली, असा त्याचा अर्थ होत नाही. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात मालिका जिंकल्या. तर विराट कोहलीच्या संघाने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय आणि ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. धोनीच्या नेतृत्वाखाली आपण दोन विश्वचषक नक्कीच उंचावले, पण त्यात एकटय़ा धोनीचे योगदान नव्हते. राहुल द्रविडने भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकवून दिली. हे सर्व खेळाडूंच्या योगदानामुळे शक्य झाले,’’ असे गंभीर म्हणाला.

विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात धोनीला भारताला विजय मिळवून देण्यात अपयश आले. त्याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या लढतीतील त्याच्या खेळीवरही अनेकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वीच धोनी निवृत्त होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविवारी विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघनिवड होणार आहे. यादरम्यानच धोनीच्या भवितव्याविषयीसुद्धा निर्णय घेतला जाईल. परंतु धोनीविषयी नेहमीच कटू बोलणाऱ्या गंभीरने निवड समितीला भावनिकरीत्या नव्हे, तर व्यावहारिक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

‘‘भविष्याकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे आहे. जेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता, त्यावेळी त्याने नेहमीच भविष्याच्या दिशेने ठोस पावले उचलली. २००८मध्ये ऑस्ट्रेलियातील मैदाने मोठी असल्याने मी, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग एकत्र खेळू शकत नाही, असे धोनी म्हणाला होता. त्याने विश्वचषकासाठी युवा खेळाडूंची मागणी केली होती,’’ असे गंभीर म्हणाला.

‘‘आता भावनिक होऊन चालणार नाही. त्यामुळे धोनीविषयी निवड समितीने व्यावहारिक निर्णय घ्यावा. ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन यांसारख्या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देण्याची वेळ आली आहे. यापैकी एकाला कायमस्वरूपी संघात स्थान देणे आवश्यक आहे,’’ असेही गंभीरने सांगितले.