माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराचे मत

मुंबई : वेस्ट इंडिज क्रिकेटला गेल्या अनेक वर्षांपासून उतरती कळा लागली असून नवनिर्वाचित कर्णधार किरॉन पोलार्डकडे संघाला प्रगतीचा मार्ग दाखवण्याची क्षमता आहे, असा आशावाद माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने व्यक्त केला.

मुंबईत आयोजित एका गोल्फ स्पर्धेच्या उद्घाटनासाठी लारा उपस्थित होता. या वेळी भारताविरुद्ध सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० मालिकेच्या पार्श्वभूमीवर विंडीज संघासमोरील नव्या आव्हानांविषयी लाराने मत मांडले.

‘‘वेस्ट इंडिज क्रिकेट २०१६च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकापासून स्थित्यंतरातून जात आहे. कसोटी आणि एकदिवसीय प्रकारात त्यांची कामगिरी बहुतांशी निराशाजनकच झाली आहे. परंतु ट्वेन्टी-२०मध्ये विंडीजने बऱ्यापैकी यश संपादन केले आहे. त्यातच आता कर्णधारपदी नव्याने नियुक्ती झालेला पोलार्ड विंडीजला यशाची शिखरे सर करून देण्यात मोलाची भूमिका बजावेल,’’ असे ५० वर्षीय लारा म्हणाला.

‘‘गेली अनेक वर्षे पोलार्ड जगभरातील ट्वेन्टी-२० लीगमध्ये खेळला आहे. त्यामुळे २०२०च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी जवळपास एका वर्षांहून कमी अवधी शिल्लक असताना पोलार्डच विंडीजचे नेतृत्व करण्यासाठी योग्य पर्याय आहे, असे मला वाटते. त्याशिवाय त्याने नव्या दमाच्या खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूममध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करून अनुभवी खेळाडूंशी त्यांचा अचूक मेळ साधून देणे गरजेचे आहे. मात्र या संघाने सामने अथवा मालिका गमावली तरी निराश न होता एक लढाऊ संघ म्हणून मायदेशी परतावे,’’ असेही २९९ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या लाराने सांगितले.

विक्रम हे तुटण्यासाठीच बनवलेले असून भविष्यात डेव्हिड वॉर्नर अथवा अन्य फलंदाजांना माझा कसोटीतील ४०० धावांचा विक्रम मोडण्याची नक्कीच संधी मिळेल, असेही लाराने सांगितले.

अतिक्रिकेट टाळावे!

मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक क्रिकेटपटूंना भेडसावत असून यावर सरशी साधण्यासाठी खेळाडूंनी अतिक्रिकेट होणार नाही, याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत लाराने व्यक्त केले. ‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त जगभरातील विविध फ्रँचायझी लीगचे प्रमाण इतके वाढले आहे की खेळाडूंना एका स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते. परंतु स्वत: खेळाडूनेच त्याच्यासाठी कोणती स्पर्धा महत्त्वाची आहे, हे ओळखणे अत्यावशक असून त्यानुसार स्पर्धाची निवड करावी,’’ असे लारा म्हणाला.