आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग प्रकरणाने भारतीय क्रिकेटला मोठा हादरा बसला आहे. पण हे सारे धक्के बाजूला सारून आता भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पध्रेच्या आव्हानासाठी सज्ज व्हायचे आहे. शनिवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या सराव सामन्याने भारतीय संघाच्या अभियानाला प्रारंभ होणार आहे. मैदानावरील खेळामुळे क्रिकेटरसिकांच्या मनात भारतीय क्रिकेटची प्रतीमा सुधारण्यासाठी वाव मिळू शकेल.
भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी येथील वातावरण अनुकूल असले तरी त्यांना लाइन आणि लेंग्थनिशी गोलंदाजी करावी लागणार आहे. आम्ही पाच गोलंदाजांनिशी खेळणार असल्याचे भारताचा संघनायक महेंद्रसिंग धोनीने आधीच स्पष्ट केले आहे. भारतीय संघाचे यश हे वेगवान गोलंदाजांवर अवलंबून आहे. युवा भुवनेश्वर कुमारकडून भारताला खूप आशा आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर पुन्हा भारतीय संघात स्थान मिळविणाऱ्या उमेश यादवकडूनही भारताला आशा आहेत. इंग्लंडमधील खेळपट्टय़ा त्याला योग्य साथ देऊ शकतील. इशांत शर्मानेसुद्धा आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना टिच्चून  गोलंदाजी केली होती. फलंदाजीही कुशलतेने करणाऱ्या इरफान पठाण या चौथ्या वेगवान गोलंदाजानिशी धोनी खेळू शकेल. या पाश्र्वभूमीवर विनय कुमारचा धोनी कशा प्रकारे वापर करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.