24 September 2020

News Flash

गोलरक्षणाय नम:!

क्रिकेट हा खेळ जसा फलंदाजांचा आहे, तसेच फुटबॉल हा खेळ आक्रमकपटूंचा आहे, असेही म्हटले जाते. पण आक्रमणपटूबरोबर महत्त्वाचे असतात ते बचावपटू. कारण प्रतिस्पर्धी संघांचे आव्हान

| June 19, 2014 04:38 am

क्रिकेट हा खेळ जसा फलंदाजांचा आहे, तसेच फुटबॉल हा खेळ आक्रमकपटूंचा आहे, असेही म्हटले जाते. पण आक्रमणपटूबरोबर महत्त्वाचे असतात ते बचावपटू. कारण प्रतिस्पर्धी संघांचे आव्हान ते थोपवत असतात. आणि फुटबॉलमध्ये गोलरक्षकही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. ब्राझील आणि मेक्सिको यांच्यातील सामन्यामध्ये हेच नेमके पाहायला मिळाले. या दोन्ही संघांतील गोलरक्षकांमुळेच सामन्यात अधिक रंगत भरली आणि कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात मेक्सिकोने एक गुण कमावला, ही त्यांच्यासाठी फार मोठी बाब आहे. मेक्सिकोचा गोलरक्षक गिलेर्नो ओकोआ हा त्यांच्या यशाचा खरा शिलेदार आहे. ब्राझील हा जोरदार आक्रमण करणारा संघ आहे. त्यांनी मेक्सिकोवर जोरदार आक्रमणे लगावली खरी, पण ओकोआच्या अभेद्य बचावापुढे त्यांची डाळ शिजली नाही. ओकोआने ब्राझीलचे आक्रमण निर्विवादपणे थोपवून लावले आणि तिथेच मेक्सिकोचा संघ वरचढ ठरला.
ब्राझीलला रोखणे सोपे नसले तरी ते मेक्सिकोने घडवून आणले ते चोख व्यूहरचनेच्या जोरावर. मेक्सिकोने यावेळी १-५-३-२ अशी व्यूहरचना रचली होती. त्यामुळे त्यांच्याकडे पाच बचावपटू होते, तर तीन मध्यरक्षकही बचाव करत असल्याने एकूण आठ खेळाडू त्याच्या गोलपोस्टजवळ होते. त्यामुळे गोल करायला ब्राझीलच्या खेळाडूंना जास्त जागा आणि संधीही मिळाली नाही. ब्राझीलच्या आक्रमणाला त्यांनी चांगलाच लगाम लावला होता आणि जो चेंडू त्यांनाही चकवा द्यायचा तो अडवायला ओकोआ समर्थ होता. ब्राझील या सामन्यात त्यांच्या १-४-३-३ या रणनीतीनुसार उतरला होता. पण आक्रमक ब्राझीलने मेक्सिकोच्या बचावापुढे शरणागती पत्करल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आतापर्यंत या दोन्ही देशांमध्ये १२ सामने झाले असून ब्राझीलने ६ सामने जिंकले असून दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. ही आकडेवारी पाहता ब्राझील बाजी मारण्याची शक्यता होती. पहिल्या सामन्यात तीन गुणांची कमाई केल्यामुळे त्यांनी जर हा सामना जिंकला असता तर त्यांना बाद फेरीत पोहोचता आले असते. पण हा सामना बरोबरीत सुटल्याने त्यांना कॅमेरुनविरुद्धच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करावा लागेल. या सामन्यात ब्राझीलकडून लौकिकाला साजेसा खेळ पाहायला मिळाला नाही. नेयमारला गोल करण्यात अपयश आले. ऑस्कर हा त्यांचा मध्यरक्षक चांगल्या फॉर्मात दिसला नाही, त्यामुळेच त्याला सामन्याची काही मिनिटे शिल्लक असताना बाहेर काढले. पण त्यांचा गोलरक्षक ज्युलियन सेसारने मात्र अप्रतिम कामगिरी केली. मेक्सिकोने या सामन्यात बचावावर भर दिला असला तरी त्यांचे आक्रमणही चांगले होते आणि या आक्रमणाला सेसारने शांत केले. सेसारकडून जर सामन्यात अपेक्षित कामगिरी झाली नसती, तर ब्राझीलवर गोल झाला असता. अखेरच्या मिनिटामध्ये मेक्सिकोला ‘फ्री-किक’ मिळाली होती, जर या संधीचे सोने मेक्सिकोला करता आले असते तर धक्कादायक निकाल लागू शकला असता. ब्राझीलला रोखले म्हणजे मेक्सिकोचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल, जर त्यांनी असाच खेळा केला तर ते उपांत्य फेरीतही दिसू शकतील. कारण विश्वचषकामध्ये कधीही काहीही होऊ शकते. हा सामना खऱ्या अर्थाने गाजवला तो दोन्ही संघांच्या गोलरक्षकांनी. प्रतिस्पध्र्याच्या आक्रमणाची धार बोथट करत त्यांनी संघाला सावरले, मोठय़ा उंचीवर नेऊन ठेवले. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 4:38 am

Web Title: goalkeeper guillermo ochoa is mexicos national hero after draw vs brazil
Next Stories
1 फुटबॉलच्या मैदानावर राजनीतीचा गोल!
2 अभी नहीं, तो कभी नहीं..
3 नेदरलँड्सचा निसटता विजय
Just Now!
X