टेनिस ही भारतीय रसिकांसाठी टीव्हीशी निगडीत असलेली गोष्ट. ग्रँड स्लॅम, एटीपी आणि डब्ल्यूटीए स्पर्धाच्या निमित्ताने जगातल्या अव्वल खेळाडूंचा दर्जेदार खेळ दूरवरून पाहणे एवढेच भारतीय टेनिसरसिकांच्या नशिबी होते. मात्र टेनिस पर्वात अवतरलेल्या लीग स्पर्धामुळे टेनिसप्रेमींना दिग्गज खेळाडूंना ‘याचि देहा याचि डोळा’ पाहण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांतच जागतिक स्तरावरील मातब्बर टेनिसपटू दिल्लीत दाखल होणार आहेत. तब्बल १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे पटकावणारा रॉजर फेडरर, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला नोव्हाक जोकोव्हिच, विक्रमी ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई करणारी सेरेना विल्यम्स यांच्यासह अँडी मरे, मारिया शारापोव्हा अशा खेळाडूंना पाहण्याची पर्वणी चाहत्यांना मिळणार आहे.
शैलीदार खेळाने जगभरातल्या चाहत्यांना जिंकून घेणारा फेडरर पहिल्यांदाच भारतात खेळणार आहे. या दुर्मीळ संधीचे सोने करण्यासाठी फेडररप्रेमी सरसावले आहेत. फेडरर आणि नदालची मक्तेदारी मोडीत काढणाऱ्या जोकोव्हिचचा खास चाहता वर्ग आहे. धमाल, हरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या जोकोव्हिचला खेळताना पाहणे ही अनोखी संधी आहे. खेळणे म्हणजे जिंकणे असे समीकरण बनलेली सेरेना आयपीटीएलच्या निमित्ताने भारतात खेळणार आहे. टेनिसमधील सौंदर्यवती मारिया शारापोव्हा भारतीय टेनिसरसिकांवर गारूड घालण्यासाठी सज्ज झाली आहे. या तुल्यबळांच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणारे सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांना घरच्या मैदानावर खेळताना पाहणेही अपूर्वाईच असणार आहे. केवळ टीव्हीवर पाहता येणाऱ्या टेनिसमधील या दिग्गजांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी भारतीय टेनिसरसिकांना आहे.
 विजय अमृतराज निर्मित्त चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धा नुकतीच आटोपली. व्हीनस विल्यम्स, अ‍ॅग्निस्झेस्का रडवान्स्का, मार्टिना हिंगिस, ज्युआन कालरेस फेरेरो, केव्हिन अँडरसन या मातब्बर खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी भारतीय टेनिसचाहत्यांना मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून दिग्गज लिएण्डर पेससह सोमदेव देववर्मन, साकेत मायनेनी, श्रीराम बालाजी, सनम सिंग यांना प्रत्यक्ष खेळताना पाहणे शक्य झाले. या दोन स्पर्धाच्या दरम्यान पुण्यात प्रीमिअर टेनिस लीग स्पर्धा रंगली आहे. बाकी खेळांचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे भारतीय टेनिसला ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.