इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक महत्त्वाचे विधान केले आहे. स्वान म्हणाला, ”वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील (डब्ल्यूटीसी) पराभवानंतरही विराट कोहलीला भारतीय संघाच्या नेतृत्वातून काढून टाकू नये. विराटला कर्णधारपदावरून दूर करणे हा क्रिकेटविरूद्ध मोठा गुन्हा ठरेल.”

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाला पुन्हा एकदा आयसीसीच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गडी राखून पराभव केला. कर्णधार म्हणून विराटला तिसऱ्यांदा आयसीसीच्या ट्रॉफीने हुलकावणी दिली. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली संघाला २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते आणि त्यानंतर २०१९च्या विश्वचषक उपांत्य फेरीमध्येही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतर विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, विराटला अजूनही टीम इंडियाचा कर्णधार म्हणून कायम ठेवले पाहिजे, असे स्वानचे मत आहे.

हेही वाचा – धक्का बसेल, पण कसोटीत सर्वाधिक षटकारांच्या विक्रमात ‘या’ दिग्गजांपूर्वी साऊदीचं नाव येतं!

स्पोर्ट्सस्किडाशी झालेल्या विशेष संभाषणात स्वान म्हणाला, “विराट कोहली हा एक चॅम्पियन आणि सुपरस्टार खेळाडू आहे. त्याने भारतीय संघाला मजबूत बनवले आहे. विकेट पडल्यानंतर त्याचा स्वभाव पाहण्यासारखा असतो. जेव्हा एखादी चूक घडते तेव्हा आपणास त्याचा चेहरा दिसतो. तो किती उत्कटतेने खेळतो ते पाहा. तो आपल्या कामाबद्दल पूर्णपणे समर्पित आहे. जेव्हा आपल्याकडे असा कर्णधार असेल, तेव्हा त्याला कर्णधारपदावरून काढून टाकणे क्रिकेटविरूद्ध मोठा गुन्हा ठरेल.”

अशी रंगली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल

अचूक रणनिती, संघातील खेळाडूंची योग्य निवड, प्रतिस्पर्ध्यांच्या कमकुवत बाजूंची माहिती आणि हवामानाचा अभ्यास या सर्व घटकांच्या जोरावर न्यूझीलंडने बलाढ्य भारताला ८ गड्यांनी पराभूत करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. नाणेफेक जिंकलेल्या न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पहिल्या डावात भारताला २१७ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २४९ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात न्यूझीलंडने भारताला जखडून ठेवत १७० धावांवर गुंडाळले. राखीव दिवसापर्यंत रंगलेल्या या सामन्यात न्यूझीलंडला भारताकडून ५३ षटकात १३९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. लॅथम आणि कॉन्वे लवकर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि अनुभवी रॉस टेलर यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेणाऱ्या न्यूझीलंडच्या काईल जेमीसनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.