06 April 2020

News Flash

भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू बुकीच्या संपर्कात; तपास अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट

बुकीने ऐनवेळी संभाषणाची टेप देण्यास नकार दिला - मिश्रा

२०११ विश्वचषक विजेता भारतीय संघ

भारतीय क्रिकेटविश्वावर पुन्हा एकदा मॅचफिक्सिंगच्या काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील एक खेळाडू हा बुकीच्या संपर्कात होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी बी. बी. मिश्रा यांनी केला आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मिश्रा यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवली होती. भारतीय संघातील ‘तो’ खेळाडू आणि बुकीमधल्या संभाषणाची टेप आपल्याला मिळणार होती, मात्र ऐनवेळी बुकीने ती टेप देण्यास नकार दिल्यामुळे आपण योग्य पद्धतीने चौकशी करु शकलो नसल्याचं मिश्रा म्हणाले. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला मिश्रा यांनी माहिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर करण्यापूर्वी आपला बुकीसोबत संवाद झाल्याचं मिश्रा म्हणाले. मात्र चौकशीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे हे प्रकरण तडीस नेता आलं नसल्याचं मिश्रांनी स्पष्ट केलं. आपल्या ४ महिन्यांच्या काळात मिश्रा यांनी तब्बल १०० जणांची चौकशी केली, ज्यामध्ये ३० खेळाडूंचाही समावेश होता. २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश मुकुल मुद्गल यांच्या अहवालातही, मिश्रा यांच्या तपासातील काही ठळक बाबींचा समावेश होता. मात्र मिश्रा यांनी केलेल्या चौकशीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबाचे तपशील उघड करण्यात आले, खेळाडूंच्या चौकशीचे तपशील समोर आलेच नसल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.

“२००८-०९ या काळात एका आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान भारतीय संघातील ‘तो’ खेळाडू आणि बुकी यांच्यातील संभाषण रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं. यातील एक आवाज हा बुकीचा होता, तर दुसरा खेळाडूचा. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मला खेळाडू आणि बुकी यांच्या आवाजाने नमुने घेऊन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणं गरजेचं होतं. मात्र मला नेमून देण्यात आलेला कार्यकक्षेत हा भाग येत नव्हता. यासाठी मला थोडा अधिकचा वेळ हवा होता, मात्र तो न मिळाल्यामुळे मी त्या दिशेने तपास करु शकलो नाही.” या काळात आपण स्वतः बुकीच्या संपर्कात असल्याचंही मिश्रा यांनी मान्य केलं. बुकीने आपल्याला पुरावे देण्याचं मान्य केलं होतं, त्यावरुन ‘तो’ खेळाडू नेमका कोण होता हे मी सांगू शकलो असतो. मात्र मोक्याच्या क्षणी बुकीने मला संभाषणाची टेप देण्यास नकार दिल्यामुळे मी ठोस पुराव्यानिशी तपास करु शकलो नाही, मिश्रांनी तपासाबद्दल माहिती दिली.

आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणात ९ खेळाडूंवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. आम्ही अधिकारी आणि खेळाडू या दोघांचीही चौकशी केली. मात्र तपासात फक्त अधिकाऱ्यांच्या चौकशीचा तपशील मांडण्यात आला. तपासादरम्यान खेळाडूंनी असं का केलं हा आमच्यासाठी मुद्दा नव्हता. यापाठीमागे कोणं कोणं लोकं आहेत ही माहिती जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र हातात ठोस पुरावे न लागल्यामुळे कोणत्याही खेळाडूवर थेट आरोप करणं टाळल्याचंही मिश्रा म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2018 8:21 am

Web Title: had tape of top player and bookie chat but no time to probe says ipl investigator b b mishra
टॅग Bcci,Ipl
Next Stories
1 Asian Games 2018 : १५ वर्षीय शार्दुल विहानला रौप्यपदक, टेनिसमध्ये भारताचं खातं उघडलं
2 Ind Vs Eng: लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवणं बंद केलं होतं, आम्ही नाही – विराट कोहली
3 Asian Games 2018 : भारताची निराशाजनक कामगिरी
Just Now!
X