वेगाशी स्पर्धा करण्याची आवड असलेल्यांच्या पसंतीत उतरणारा खेळ म्हणजे फॉम्र्युला-वन. या शर्यतीत प्रसंगावधान राखून अचूक निर्णय घेण्याची कसोटी लागते. किंबहुना शर्यतपटूंसाठी ही सत्त्वपरीक्षाच असते. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ हा उपदेश फॉम्र्युला-वन शर्यतपटूंसाठी फार महत्त्वाचा, कारण येथे सेकंदाच्या दशांश भागाहून कमी कालावधीत परिस्थिती बदलते. त्यामुळे सतर्कता हे या खेळातील प्रमुख अस्त्र. सरत्या वर्षांत या अस्त्राचा योग्य रीतीने वापर करून लुइस हॅमिल्टनने वर्षांतील सर्वोत्तम शर्यतपटूचा मान पटकावला. त्याला अपेक्षेप्रमाणे (किंवा ठरल्याप्रमाणे) संघसहकारी निको रोसबर्गकडून कडवी झुंज मिळाली. पण यंदा रेड बुलची साथ सोडून फेरारीशी हातमिळवणी केलेल्या माजी विश्वविजेत्या सेबेस्टियन वेटेलने अनपेक्षित कामगिरी करून हॅमिल्टन व रोसबर्ग या जोडीसमोर कडवे आव्हान उभे केले.

हॅमिल्टनचे साम्राज्य
थोडासा स्टायलिश.. डोळ्यांवर गडद रंगाचा गॉगल. चालण्यातील लक्ष वेधून घेणारी अदाकारी.. चेहऱ्यावर स्मित हास्य.. सर्किटच्या बाहेर लुइस हॅमिल्टनची दिसणारी ही छटा सर्किटवर येताच बदलते. जणू आपला जन्म वाऱ्याशी स्पर्धा करण्यासाठीच झाला आहे आणि आपणच जेता असल्याच्या आविर्भावात तो वावरतो. त्याचे या वावरण्यात काहीच गैर नाही, कारण तो त्याच्या कृतीतून हे वारंवार सिद्ध करत आला आहे. २०१४ प्रमाणे २०१५चा हंगामही हॅमिल्टनच्याच नावावर राहिला. २०१५च्या हंगामाच्या प्रवासाची सुरुवात १५ मार्चला ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि. पासून झाली आणि २९ नोव्हेंबरला अबुधाबी येथे झाली. हा प्रवास ठरलेलाच असतो, पण यंदा काही बदलांमुळे यातील आव्हाने वाढली होती. वर्षांतील एकूण १९ स्पर्धापैकी १०मध्ये हॅमिल्टनने वर्चस्व गाजवले. याच कामगिरीच्या जोरावर हॅमिल्टनने ३८१ गुणांची कमाई करत सलग दुसऱ्यांदा व एकूण तिसऱ्यांदा विश्वविजेतेपदाचा मान पटकावला.

नियोजित विजेता, अन् वेटेलचा खोडा
अपेक्षेप्रमाणे हॅमिल्टनचेच राज्य प्रस्थापित झाले असले तरी एकूणच हे सर्व नियोजित असल्याचे वारंवार जाणवत होते. हॅमिल्टनला लाभलेली लोकप्रियता, त्याच्यावर मोठमोठय़ा ब्रँडनी केलेली गुंतवणूक आणि त्याला दिलेले प्रायोजकत्व यामुळे या सत्राचा विजेता हा आधीच ठरला होता आणि त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची होती. शेवटी एफ-१ला जागतिक स्तरावर असलेली लोकप्रियता लक्षात घेता हे महत्त्वाचे होते. रोसबर्ग आणि हॅमिल्टन यांच्यातील भांडण, हे ‘तू मारल्यासारखे कर..’ असेच होते. हे हंगामातील निकालातून स्पष्ट होते. हॅमिल्टनने आपले विश्वविजेतेपद निश्चित केल्यानंतर म्हणजेच अमेरिकन ग्रां. प्रि. शर्यतीनंतर जणू औपचारिकता म्हणून स्पध्रेत सहभाग घेतला. त्यामुळेच हंगामातील अखेरच्या तिन्ही (मेक्सिकन, ब्राझिलीयन व अबुधाबी) शर्यतीत रोसबर्गने जेतेपद पटकावत विश्वविजेत्या शर्यतीत दुसरे स्थान निश्चित केले. संघातील दोन्ही शर्यतपटू विश्वविजेत्याच्या शर्यतीत अव्वल दोन स्थानावर असणे हे मर्सिडिज संघासाठी फायद्याचे होते आणि त्यात ते यशस्वी झाले. मात्र रेड बुलसोबत १५ वर्षांचा करार मोडून फेरारीशी नाते जोडलेल्या वेटेलने या नियोजित गणितात थोडासा खोडा घालण्याचा प्रयत्न केला. हंगामाच्या दुसऱ्याच शर्यतीत मलेशियन ग्रां प्रि.मध्ये वेटेलने बाजी मारून याचे संकेत दिले. त्यानंतर हंगेरियन आणि सिंगापूर या सर्किटवरही वेटेलने दावा सांगून चुरस निर्माण केली होती.

इंडियन ग्रां. प्रि. हद्दपारच
१९९२नंतर मेक्सिकन ग्रां. प्रि. शर्यतीला पहिल्यांदा फॉम्र्युला-वन शर्यतीच्या वेळापत्रकात स्थान मिळाले होते, तर सर्किट शर्यतीसाठी धोकादायक असल्यामुळे जर्मन ग्रां. प्रि. शर्यतीला वगळण्यात आले. ५५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जर्मनीत फॉम्र्युला-वनचा थरार रंगला नाही. अमेरिका ग्रां. प्रि.ला २०१३पासून पदार्पण करण्यात सलग तिसऱ्यांदा अपयश आले, तर कराचा मुद्दा प्रलंबित राहिल्याने सलग दुसऱ्यांदा इंडियन ग्रां प्रि. शर्यतीलाही यजमानपद नाकारण्यात आले.

बियांचीची अधुरी कहाणी..
५ ऑक्टोबर २०१४च्या जापनीज ग्रां. प्रि. शर्यतीत मरुसिया एफ-वन संघाचा शर्यतपटू ज्युल्स बियांची याच्या गाडीला अपघात झाला. या अपघातामुळे कोमात गेलेल्या बियांचीने जवळपास आठ महिने मृत्यूशी लढा दिला. अखेरीस जुलै २०१५मध्ये या लढय़ात त्याचा पराभव झाला आणि बियांचीची कहाणी अधुरी राहिली. बियांचीच्या या निधनानंतर फॉम्र्युला वन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आणि आयोजकांनी त्यावर बैठक बोलावून नियमावलीही तयार केली.

– स्वदेश घाणेकर
swadesh.ghanekar@expressindia.com