गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाढत्या वीजबिलाचा मुद्दा चांगलाच चर्चिला जात आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना वाढत्या वीजबिलाचा फटका बसला आहे. यात अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे, हुमा कुरेशी, अभिनेता अर्शद वारसी साऱ्यांचा समावेश आहे. त्यातच आता नव्या सेलिब्रिटीची म्हणजेच फिरकीपटू क्रिकेटर हरभजन सिंगची भर पडली आहे.

हरभजनने ट्विट करत आपल्याला आलेल्या वीज बिलाविषयी माहिती दिली असून संताप व्यक्त केला आहे. वीज बिलासंबंधीचा मेसेज त्याने तसाच्या तसा ट्विट केला असून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. “एवढं बिल? काय पूर्ण मोहल्ल्याचं बिल मलाच पाठवलं की काय? माझ्या नियमित बिलापेक्षा सातपट जास्त… कसं काय?” असे ट्विट करत हरभजनने आपल्या बिलाची रक्कम सांगितली आहे. हरभजनला ३ लाख ३९ हजार ९०० रूपये इतकं वीज बिल आलं असून अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड यांनी हे बिल भरण्यासाठी त्याला १७ ऑगस्टपर्यंतचा कालावधी दिला आहे.

याआधी हुमा कुरेशीनेही वीज बिलाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. “गेल्या महिन्यात मी ६००० रुपये वीज बिल भरले आणि आता या महिन्यात मला ५० हजार रुपये बिल?’ असे हुमाने ट्विट केले होते. अभिनेत्री तापसी पन्नूलाही तब्बल ३६ हजारांची वीज बिल आल्याचे तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. तसेच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनाही २९ हजार ७०० रुपये वीज बिल आलं होतं. तर अभिनेता आर्शद वारसीला एका महिन्यात तब्बल १ लाख ३ हजार ५६४ रुपये वीज बिल आलं होतं.

बिलं का वाढली?

टाळेबंदीच्या काळात वाढलेला वीजवापर आणि एप्रिलपासून वाढलेले वीजदर यामुळे वीज देयकांत लक्षणीय वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. त्याचप्रमाणे आधीच्या दोन महिन्यांतील सरासरी आणि प्रत्यक्ष वीजवापर यांच्यातील फरकाची रक्कमही देयकांत जोडण्यात आल्याने नागरिकांवर भार वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात.