वाईट कामगिरीमुळे डच्चू देण्यात आलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगला संघात पुनरागमन करण्याची वाट बिकट वाटत असली तरी आपल्यापेक्षा कोणीही मोठा नाही, असा टेंभा मिरवण्यात तो सध्या मश्गूल आहे. माझी स्पर्धा फक्त स्वत:शीच असून अश्विनशी नाही, असे वक्तव्य करीत हरभजनने पुन्हा एका नवीन वादाला तोंड फोडले आहे.
‘‘कारकिर्दीमध्ये माझी फक्त एकाच व्यक्तीशी स्पर्धा होती आणि ती व्यक्ती म्हणजे मी स्वत:. माझी स्पर्धा अन्य कोणाबरोबरही नाही,’’ असे म्हणत हरभजनने अश्विनचे नाव न घेता खुमखुमी मिरवली आहे. तो पुढे म्हणाला की, ‘‘जेव्हा तुम्ही स्वत:शीच स्पर्धा करता तेव्हा तुम्ही एक क्रिकेटपटू म्हणून प्रगल्भ होत असता.
अन्य काही व्यक्तींबरोबर स्पर्धा करण्यात काहीच अर्थ नाही. सर्वोत्तम कामगिरी करायची आणि बाकी अन्य लोकांना परीक्षण करायला द्यायचे. सध्याच्या भारतीय संघातील कोणत्याही खेळाडूबद्दल मला काहीही बोलायचे नाही.’’
हरभजनचे वय जास्त असल्यामुळे त्याला संघात स्थान दिले जात नसल्याचे काही जण म्हणत असले तरी त्याला मात्र हे पटत नाही. याबाबत तो म्हणाला की, ‘‘वय हा फक्त एक आकडा आहे, याचा खेळाशी काहीही संबंध नाही. जर ४५ वर्षांचा खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करीत असेल तर त्याला कोण थांबवणार. मला अजूनही भारताकडून खेळण्याची इच्छा आहे. जोपर्यंत मी क्रिकेटचा आनंद लुटतोय तोपर्यंत भारतासाठी खेळण्याची इच्छा माझ्या मनात असेल.’’
लोकसभा निवडणुकीसाठी
मला विचारणा झाली होती
हरभजन काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवणार, अशी बातमी काही दिवसांपूर्वी झळकली होती. यावर हरभजन म्हणाला की, ‘‘लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारणा करण्यात आली होती. पण सध्या राजकारणामध्ये जाण्यात मला रस नाही. माझ्यामध्ये अजून बरेच क्रिकेट शिल्लक आहे, असे मला वाटते. ही वेळ खेळावर लक्ष केंद्रित करण्यासाठीची आहे.’’