सचिन तेंडुलकर म्हणजे विक्रमादित्य. अनेक विश्वविक्रम त्याने रचले आणि तिथपर्यंत पोहोचणे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी नक्कीच सोपे नाही. पण क्रिकेटमधील धावा आणि विक्रम नोंदवणाऱ्या गुणलेखक आणि सांख्यिकी यांनाही सचिनच्या धावांची आणि विक्रमांची नोंद ठेवणे सोपे नसल्याचे सांगितले. सुधीर वैद्य, उदय घरत आणि गंगाराम सकपाळ या तिघांचीही सचिनच्या धावांशी बालपणापासून जवळीक आहे. सचिन मैदानात उतरतो तेव्हा कोणता तरी विक्रम होतोच, एवढे वलय सचिनला असल्याचे ही मंडळी आवर्जून सांगतात.
याबाबत वैद्य म्हणाले की, ‘‘सचिनच्या प्रत्येक प्रवेशाला कोणता ना कोणता तरी विक्रम व्हायचाच. या साऱ्या विक्रमांनी आमचे काम कठीण केले होते. पण हे कार्य आनंददायी होते. कारण त्याच्याबद्दल नेहमीच आपुलकी होती, तो आपल्यातलाच वाटायचा. सचिनची ग्वाल्हेर येथील एकदिवसीय सामन्यामधील २०० धावांची खेळी ही मला आतापर्यंतची अप्रतिम खेळी वाटते. सचिन कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्या प्रकाराच्या दर्जानुसार खेळला. कसोटीमध्ये त्याने कधी एकदिवसीय क्रिकेटचे फटके मारले नाहीत आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये कसोटीतले फटके मारले नाहीत, हीच त्याची महानता आहे. सचिनच्या निवृत्तीबाबत मनात खंत आहे. पण यापुढे तो क्रिकेटला नक्कीच आपल्या अनुभवाच्या जोरावर योगदान देईल.’’
हॅरिस चषक क्रिकेटमधील ६६४ धावांच्या शालेय विक्रमापासून ते त्याच्या दोनशेव्या कसोटी सामन्यापर्यंत सचिनच्या सामन्यांचे गुणलेखन करणाऱ्या उदय घरत यांनी सांगितले की, ‘‘सचिनची गुणवत्ता ही त्याच्या शालेय जीवनातच दिसून आली होती. त्याचा शालेय स्तरावरील विक्रमच सारे काही सांगून जातो. एका रणजी सामन्यात तर त्याने रॉबिन सिंगसारख्या चपळ क्षेत्ररक्षकाच्या हाताखालून कव्हर्सला चौकार ठोकला होता. याचप्रमाणे सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत २०० धावांची अप्रतिम खेळी साकारली होती, तशी खेळी मी आजतागायत पाहिलेली नाही. अखेरच्या सामन्यातही अशीच अद्भुत खेळी साकारून तो क्रिकेटला अलविदा करेल अशी आशा आहे.’’
सचिनला १४ वर्षांपासून पाहात आलेले गंगाराम सकपाळ म्हणतात की, ‘‘सचिनबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. कारण तो क्रिकेट फक्त खेळला नाही तर जगला. इम्रान खान, रिचर्ड हॅडली यांच्यासारख्या मोठय़ा खेळाडूंसोबत सचिन खेळला; तर दुसरीकडे सचिनने जेव्हा रणजी पदार्पण केले त्या दिवशी जन्मलेल्या धवल कुलकर्णीबरोबरही तो खेळला. २४ वर्षे सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकून राहणे नक्कीच सोपे नसते. सचिनने ग्वाल्हेरच्या द्विशतकी खेळीत तब्बल ११८ धावा चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने काढल्या होत्या. आता तो अखेरचा सामना खेळायला उतरेल, तेव्हा ती खेळी डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न असेल.’’