चेन्नई येथेली चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी भारतीय संघावर विराट पराभवाची नामुष्की ओढावली. जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करल्यानं इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांवर २२७ धावांनी दणदणीत यश संपादन केलं. या विजयासह इंग्लंड संघानं चार कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन फिरकीपटूंना संघात स्थान दिलं होतं. मात्र, अश्विनचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही. इंग्लंडचे खेळाडू डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजांना खेळताना अडखळतात म्हणून कुलदीप यादव याला डावलून नवख्या शाबाज नदीमला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, विराट कोहलीच्या या निर्णायावर अनेकांनी नाराजी व्यक्त करत टीका केला होती. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीनं संघात बदल करावेत, असा सल्ला माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान समालोचक सुनिल गावसकर यांनी दिला आहे.

गावस्कर म्हणाले की, ‘ चेन्नई येथे रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात बदल करणं गरजेचं आहे. दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव याला अंतिम ११ मध्ये संधी द्यायला हवी, असे मला वाटतेय. आर. अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन फिरकीपटूसोबत तिसरा फिरकीपटू म्हणून कुलदीपला संघात स्थान द्यावं. अनुभवी अश्विन चेंडू हवेत संथगतीने सोडतो, तर सुंदर अश्विनपेक्षा जास्त वेगात चेंडू सोडतो. यांच्या जोडीला जर कुलदीप यादवला संघात स्थान दिले तर नक्कीच भारतीय गोलंदाजीमध्ये विविधता पाहायला मिळेल.’

आणखी वाचा- IND vs ENG : २२ वर्षानंतर इंग्लंडनं भारताच्या गडाला लावला सुरुंग

वॉशिंगटन सुंदरला दुसऱ्या सामन्यातून वगळणं थोडं कठीण आहे. कारण, गोलंदाजीत अपयशी ठरला असला तरी पहिल्या डावात त्यानं महत्वपूर्ण ८५ धावांची खेळी केली होती. त्यामुळे सुंदरचं संघातील स्थान अबाधित राहू शकतं. दुसऱ्या कसोटीसाठी कोणाला संघात ठेवायचं आणि कोणाला वगळायचे, हा निर्णय संघ व्यवस्थापनाचा असेल. नदीम की सुंदर यांच्यापैकी कोणाला विश्रांती द्यायची, हे त्यांनाच ठरवावे लागेल. पण कुलदीपला दुसऱ्या कसोटीत स्थान मिळायला हवं असं मला वाटतं, असे गावसकर म्हणाले.

आणखी वाचा- भारताच्या पराभवानंतर पीटरसनचा टोमणा; म्हणाला, ‘मैंने पेहले ही… ‘

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तब्बल २२७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाचव्या दिवशी ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा खराब कामगिरी केली. भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. मालिकेतील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे. हा सामना जिंकून विराट कोहली आणि टीम मालिकेत १-१ अशी बरोबर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.