यंदाच्या मोसमात युरोप खंडातील सर्वाधिक गोल जगविख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या नावावर असल्यामुळे विश्वचषक फुटबॉल स्पध्रेला सामोरे जाताना त्याचा आत्मविश्वास उंचावणार आहे. मेसीने यंदाच्या हंगामात एकूण ४५ गोल केले असून त्याच्यापाठोपाठ लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह आणि रेयाल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो हे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

मेसीने पाच प्रमुख लीगमध्ये एकूण ५४ सामन्यांमध्ये क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. या सर्व सामन्यांमध्ये मिळून त्याने ४५ गोल केले असून ते मेसीच्या श्रेष्ठत्वाची प्रचीती देण्यास पुरेसे आहेत. मेसीच्या या ४५ गोलपैकी ३४ गोल हे ला लिगा स्पर्धेमध्ये त्याने नोंदवले आहेत. त्यामुळेच मेसीला हंगामातील सर्वाधिक गोल नोंदवणारा फुटबॉलपटू बनणे शक्य झाले आहे. तसेच ला लिगातील त्याच्या या कामगिरीनेच ‘गोल्डन बूट’ पुरस्कारसुद्धा त्याने प्राप्त केला.

फरक फक्त एक गोलचा

अर्थात मेसीची ही आघाडी केवळ एक गोलची असून सलाह आणि रोनाल्डो या दोघांनी ४४ गोलची नोंद केली आहे. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात या दोन्ही खेळाडूंना एकमेकांच्या संघांविरुद्ध एकही गोल नोंदवता आलेला नसल्याने त्यांची गोलबरोबरी कायम राहिली आहे. त्यातील एकाने जरी एखादा गोल नोंदवला असता तरी ते मेसीच्या बरोबरीला पोहोचले असते. विशेष म्हणजे सलाहने मेसीपेक्षा दोन सामने कमी खेळले असून रोनाल्डोने तर अवघ्या ४४ सामन्यांत ४४ गोलची नोंद केली आहे. म्हणजेच दर सामन्याला सरासरी एक गोल असे त्याचे प्रमाण आहे.