महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. दुसरीकडे धोनी सहमालक असलेल्या रांची रेजने हॉकी इंडिया लीग स्पर्धेत पदार्पणातच जेतेपदाचा मान पटकावला. अंतिम लढतीत रांचीने पंजाब वॉरियर्स संघाला नमवले. निर्धारित वेळेत ही लढत बरोबरीत सुटली. टायब्रेकरद्वारे झालेल्या मुकाबल्यात रांचीने पंजाबवर ५-४ असा निसटता विजय मिळवला.
उत्कंठापूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात पूर्ण वेळेत २-२ अशी बरोबरी झाली होती. त्या वेळी रांची रेज संघाकडून स्टॅन्ले मिन्झ (४४ वे मिनिट) व बॅरी मिडलटोन (५८ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पंजाबच्या किरॉन गोव्हर्स (३९ वे मिनिट) व ख्रिस्तोफर सिरिल्लो (५७ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पूर्वार्धात एकही गोल झाला नाही.
टायब्रेकरमध्ये रांची संघाकडून अ‍ॅश्ले जॅक्सन याने दोन गोल केले. त्याचा सहकारी मनप्रित सिंग याने पेनल्टीद्वारा गोल करण्यासाठी चाल केली, त्यावेळी पंजाबचा गोलरक्षक जॉप स्टॉकमनने त्याला धक्का देत पाडले. त्यामुळे रांची संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला होता. त्याचा फायदा जॅक्सनने अचूकपणे घेतला. डॅनियल विएलने एक गोल करीत त्याला साथ दिली.
पंजाबकडून ख्रिस्तोफर सिरिल्लो व धरमवीर सिंग या दोन खेळाडूंनी गोल केले. त्यामुळे टायब्रेकर ३-२ असा घेत रांची संघाने ५-४ असा विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत दिल्ली व्हेवरायडर्सने उत्तर प्रदेश विझार्ड्सवर २-१ अशी मात केली.
अ‍ॅश्ले जॅक्सनला स्पर्धेतील सवरेत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.