आठवडय़ाची मुलाखत : निपोन दास, हिमा दासचे प्रशिक्षक

धनंजय रिसोडकर, मुंबई</strong>

भारतासारख्या विकसनशील देशांना ‘तिसऱ्या जगातील देश’ म्हणून संभावना करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशाच्या खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर फेकून पहिले स्थान पटकावण्याची कामगिरी अ‍ॅथलेटिक्समध्ये करणे. अवघ्या वर्षभरात राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची कामगिरी म्हणजे जादूच घडण्यासारखे आहे. त्यामुळेच हिमा दास ही एक जादूची छडीच आहे, अशा शब्दांत निपोन दास यांनी त्यांच्या शिष्येचे गुणवर्णन केले.

आसामच्या नागाव जिल्ह्य़ातील ढिंग या अत्यंत छोटय़ा गावातील अफलातून धावपटू हिमाला ‘ढिंग एक्स्प्रेस’ म्हणून ओळखले जाते. पण हे नाव पडले तेदेखील अवघ्या वर्षभरापूर्वीच. हिमाला भारतीय संघातील आघाडीची फुटबॉलपटू म्हणून नाव कमवायचे होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. हिमाच्या कारकीर्दीचा हा चमत्कार घडवणारे आसामचे अ‍ॅथलेटिक्स प्रशिक्षक निपोन दास यांच्याशी केलेली खास बातचीत-

*  हिमाबरोबरची पहिली भेट किंवा तिच्यात काही वेगळे आहे, असे कधी वाटले?

शेतकरी कुटुंबातील सामान्य बालकांप्रमाणेच तिचे बालपण गेल्याने ती काटक आणि वेगवान होती. भावंडे आणि आसपासच्या मुलांसोबत फुटबॉल खेळण्याची तिला खूप आवड होती. नवोदय विद्यालयातील स्पर्धामध्ये तिचे धावण्याचे कौशल्य पाहून शाळेतील क्रीडा शिक्षक मोहम्मद शमसुल हक यांनी तिला फुटबॉलपेक्षा धावण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अवघ्या तीन-चार वर्षांपूर्वीपासूनच धावणे या प्रकाराकडे ती गांभीर्याने बघू लागली. पण तिची पहिली भेट ही जानेवारी २०१७ साली एका प्रशिक्षण शिबिरात झाली. त्या वेळी ती माझ्यासाठी एक सामान्य धावपटूच होती. मी तिला त्या वेळी नावानेदेखील ओळखत नव्हतो. मात्र, तिला गुवाहाटीत येऊन प्रशिक्षण घ्यायचे असल्याने ती मला वारंवार फोन करून हॉस्टेलची विचारणा करायची, म्हणून मी तिचा मोबाइल क्रमांकदेखील ‘ट्रायल कॅम्प’ याच नावाने मोबाइलमध्ये ठेवला होता.

*  हिमा धावण्यात उत्तम कारकीर्द घडवू शकते, असे केव्हा वाटले? 

‘खेलो इंडिया’अंतर्गत गुजरातमध्ये झालेल्या १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील पहिल्याच स्पर्धेत आणि तेदेखील सिंथेटिक ट्रॅकवर धावण्याचा किंचितही सराव नसताना तिने ही कामगिरी केल्याने ती धावण्यात कारकीर्द घडवू शकते, असे आम्हाला वाटले. त्यामुळे तिला आम्ही गुवाहाटीला बोलावले. तिने तिच्या पालकांकडे त्यासाठी परवानगी मागितली. पण पालकांना तिला गुवाहाटीला पाठवणे आर्थिकदृष्टय़ा शक्य नव्हते. मग आम्ही तिची राहण्याची आणि जेवणाचीही सोय करण्याचे आश्वासन दिल्यावर तिचे पालक राजी झाले. मग तिथे आम्ही तिच्या प्रशिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली. दरम्यान तिची पतियाळातील राष्ट्रीय अकादमीत निवड झाल्यावर तिथे रशियन प्रशिक्षिका गॅलीना बुखारीना यांनीदेखील तिच्या कौशल्यात भर घातली.

*  हिमाचे कोणते वैशिष्टय़ आहे, ज्यामुळे इतक्या कमी कालावधीत ती शिखराकडे जाऊ शकली, असे तुम्हाला वाटते?

तिचे वागणे, बोलणे, वावरणे अत्यंत बिनधास्त मुलांप्रमाणे आहे. तिच्या शब्दकोशात भीती हा शब्दच नाही. त्यामुळे तिच्या आसपास कोण राष्ट्रकुल विजेता आहे की आशियाई विजेता आहे किंवा अन्य कुणी आहे, त्याचा ती अजिबात विचार करीत नाही. त्यामुळे दबाव हा शब्दच तिला माहीत नाही. तसेच प्रचंड मेहनत घेण्याची तिची तयारी अत्यंत दुर्मीळ आहे. तिला मैदानाजवळच्या एका सामान्य खोलीत राहण्यासाठी जागा दिल्यानंतर कोणत्याही अडथळ्याचा बाऊ न करता ती दररोज पहाटे मैदानावर नित्यनेमाने हजर असायची. मग एकदा का तिला अपेक्षित वेळ सांगितली की बंदुकीचा आवाज आणि निर्धारित लक्ष्य याशिवाय तिला दुसरे काहीच दिसत नाही.

*  तिच्या रूपाने राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये चमत्कार घडू शकेल का?

पुढील राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत भारताला ४०० मीटरच्या शर्यतीत पदकाच्या आशा धरता येतील, असे मला वाटते. मात्र अवघ्या दोन वर्षांवर आलेल्या ऑलिम्पिकमध्ये पात्र होणे, हीदेखील मोठी कामगिरी ठरते. त्यासाठी ५० सेकंदांच्या आसपासचे लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. प्रथम ऑलिम्पिकला ती पात्र होऊ दे. त्यानंतरच पुढील बाबींवर भाष्य करता येईल. पण ऑलिम्पिक पदकदेखील अशक्य नाही, हे हिमा सिद्ध करून दाखवेल, असा विश्वास वाटतो.