न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या चौरंगी हॉकी मालिकेत भारतीय संघाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेच्या पहिल्या सत्रातील अंतिम सामन्यातही भारत अंतिम सामन्यात बेल्जियमकडून पराभूत झाला होता, आणि दुसऱ्या सत्रातील अंतिम सामन्यातही भारताला बेल्जियमने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-० च्या फरकाने हरवलं. मात्र याआधी भारताने बलाढ्य बेल्जियमला ४-४ अशा बरोबरीत रोखून धरत आपल्या लढाऊ बाण्याचं दर्शन घडवून दिलं.

निर्धारित सामन्यात बरोबरी साधणाऱ्या भारतीय संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमच्या खेळाडूंना रोखता आलं नाही. फेलिक्स डेनियार, सबॅस्टिअन डॉकीअर आणि आर्थर वॅन डोरेन यांनी बेल्जियमकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल झळकावले. भारताच्या एकाही खेळाडूला गोल करण्यात यश मिळालं नाही. याआधी झालेल्या सामन्यात भारताकडून रमणदीप सिंह ( २९ आणि ५३ वे मिनीट), निलकांत शर्मा (४२ वे मिनीट) आणि मनदीप सिंह (४९ वे मिनीट) यांनी गोल झळकावले.

भारतीय संघाने अंतिम सामन्यात अतिशय सावधपणे सुरुवात केली होती. मात्र बेल्जियमने अंतिम सामन्यात आपला आक्रमक पवित्रा कायम राखत भारतीय गोलपोस्टवर सतत आक्रमण केली. मात्र भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने आपल्या अभेद्य बचावाने बेल्जियम खेळाडूंची डाळ शिजू दिली नाही. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी निर्धारीत वेळेत ४-४ गोल केल्याने निकालासाठी सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. यावेळी बेल्जियमने बाजी मारत पुन्हा एकदा विजेतेपद आपल्या नावे केलं. दुसरीकडे कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात जपानने यजमान न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-१ असा पराभव केला.