मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जून तेंडुलकरबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. अर्जूनमध्ये मला सचिन दिसत नाही, त्याच्यात अर्जूनच दिसतो. आमची तुलना करणेच चुकीचे आहे, असे सचिनने म्हटले आहे. माझ्या वडिलांनी मला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मी देखील अर्जूनला असेच स्वातंत्र्य दिले असून त्याने त्याची आवड आणि खेळावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्लाही सचिनने दिला आहे.

ग्रेटर नोएडात सध्या ऑटो एक्स्पो सुरु असून यात सचिन तेंडुलकरने हजेरी लावली. यादरम्यान सचिनने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली असून त्याने मुलगा अर्जून, क्रिकेट आणि कार याबाबत भाष्य केले. मुलाबाबत सचिन म्हणतो, मला वडिलांनी स्वातंत्र्य दिले. आता मी देखील माझ्या मुलाला स्वातंत्र्य दिले आहे. त्याला आयुष्यात जे करायचे आहे त्यात त्याने सर्वोत्तम दिले पाहिजे. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जूनवर दबाव येतो का असा प्रश्न विचारला असता सचिन म्हणतो, त्याच्यावर दबाव येणारच. पण त्याने खेळावर आणि त्याच्या आवडीवर लक्ष केंद्रीत करावे. काही लोक तुलना करतीलच, पण माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली. तुम्ही कोणतेही काम करताना त्यावर लक्ष केंद्रीत करा, मग सर्व गोष्टी त्यानुसारच घडत जातात. चढ-उतार हा आयुष्यातील एक भाग आहे. पण तुम्ही स्वतःला पुढे नेले पाहिजे. मी देखील हेच केले होते, असे त्याने सांगितले.

भारतीय संघाबाबत सचिन म्हणतो, मी संघाची तुलना करत नाही. संघ सध्या चांगली कामगिरी करतोय आणि त्यांनीच अशीच कामगिरी करत राहावी. जर संघाने चांगली कामगिरी केली नाही तर त्यांना आपण प्रोत्साहनच दिले पाहिजे. एखादा व्यक्ती आक्रमक नसेल तर त्याला जिंकायला आवडत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. काही लोकांमध्ये आक्रमकता असते तर काही लोकांमध्ये नसते, असे त्याने सांगितले. विराट कोहलीच्या आक्रमकतेवर तो बोलत होता. लहानपणी आईवडिलांसोबत टॅक्सीत फिरत असतानाच मला कारची आवड निर्माण झाली, असे त्याने आवर्जून नमूद केले.