भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. गेल्या वर्षभरात त्याच्या बॅटमधून धावांचा चांगलाच ओघ सुरु आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतही विराटवर भारतीय संघाची मदार असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 दिवसांच्या सराव सामन्यामध्ये विराटसोबत इतर भारतीय फलंदाजांनी चांगला सराव करुन घेतला आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल असा विश्वास विराटने व्यक्त केला आहे. या कसोटी मालिकेत कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र, कोणासमोरही स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसल्याने कोहलीला वाटते. मैदानावर शंभर टक्के योगदान देण्यासाठी सज्ज असल्याचे त्याने सांगितले.

“प्रत्येक मालिका तुम्हाला खेळाडू म्हणून एक गोष्ट शिकवून जाते. प्रत्येक दौऱ्यात तुमच्यासमोर नवीन आव्हानं असतात. ऑस्ट्रेलियाच्या मागील दौऱ्यात मी चोख कामगिरी करून दाखवली आहे. त्यामुळे मला या दौऱ्यात कोणासमोर स्वतःला सिद्ध करण्याची काहीच गरज नाही,” असे मत कोहलीने सिडनीतील एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. यापुढे बोलताना माझ्याकडून संघाला काय हवंय हे मला माहिती असल्यामुळे मी मैदानात शंभर टक्के कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन असं कोहलीने स्पष्ट केलं.

अवश्य वाचा – Ind vs Aus : विराटला बाद करण्याची आमच्या गोलंदाजांमध्ये क्षमता – टीम पेन

दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या सराव सामना भारताने अनिर्णीत राखला. अखेरच्या दिवशी मुरली विजयने 129 धावांची खेळी केली. लोकेश राहुलनेही 62 धावा करताना सूर सापडल्याचा दिलासा दिला. भारताने हा सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 544 धावांचा डोंगर उभा केला आणि 186 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 211 धावा करून सामना अनिर्णीत सोडवला.

अवश्य वाचा – Ind vs Aus : पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल