भारत क्लब व पुणे फुटबॉल क्लब यांच्यात शनिवारी येथे आयलीग फुटबॉल स्पर्धेचा सामना होत आहे. या दोन्ही पुण्याच्याच संघांमध्ये होणारा हा पहिलाच सामना आहे.
शिवछत्रपती क्रीडानगरी येथे सायंकाळी सात वाजता या लढतीस प्रारंभ होईल. पुणे क्लबने आतापर्यंत सोळा गुण मिळवित चौथे स्थान घेतले आहे. भारत क्लबचे १० गुण असून ते सध्या आठव्या क्रमांकावर आहेत. पुणे क्लबचा उपकर्णधार अराटा इझुमी याच्यावर बेशिस्त वर्तनाबद्दल कारवाई झाली असल्यामुळे तो शनिवारी खेळू शकणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत अमरिंदरसिंग, निखिल कदम व थाँगशिम हौकिप यांच्यावर पुण्याची मुख्य मदार आहे. पुणे क्लबने नुकत्याच झालेल्या लढतीत रॉयल वािहगदोह संघास १-१ असे बरोबरीत रोखले होते. भारत क्लबने नुकतीच धेम्पो संघाशी गोलशून्य बरोबरी स्वीकारली होती. भारत क्लबची मदार  क्रिस ब्राईट, सुभाषसिंग, लेस्टर फर्नान्डीस यांच्यावर आहे.